70 खोके एकदम ओक्के- सुनील बोधनकर

बाईपण भारी देवा सिनेमानं धमाल उडवून दिलीय. सोशल मीडियावरचे महिलांचे व्हिडिओज पाहताना असं वाटून जातं कि, मराठी सिनेमाला ‌‘स्वर्ग फक्त दोन बोटे’च काय तो उरलाय! सिनेमाची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहता मराठी सिनेमाला काहीच कमी नाही असंही वाटेल, मात्र, असं भाग्य प्रत्येक मराठी सिनेमाच्या नशीबी नाही. अगदी दोनेक महिन्यांपूर्वी ‌‘टीडीएम’ नावाच्या सिनेमाला थिएटर न मिळाल्यानं प्रोड्यूसरच्या डोळ्यातून आलेलं पाणी मीडियामध्ये ट्रेंड करत होतं, ते पाणी पाहून सरकारलाही पाझर फुटला. मराठी सिनेमा वर्षातून किमान दोन आठवडे नाही दाखवला तर प्रत्येक सिनेमागृहाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची ही घोषणा केली गेली, मी स्वतः सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगुंटीवारांच्या त्या मीटिंगला हजर होतो. एवढं होऊनही मराठी सिनेमासाठी ‘पळसाला पानं तीनच’ अशी परिस्थिती!

दोनेक महिन्यातली ही दोन वेगवेगळी उदाहरणं, एक ‌‘टीडीएम’ आणि दुसरं ‌‘बाईपण भारी देवा’, असं नाही कि, मराठी सिनेमा पाहायला प्रेक्षक अजिबातच येत नाही. काही महिन्यांपूर्वी ‌‘वाळवी’ची जबरदस्त क्रेझ झाली होती. सिनेमा ‌‘डार्क ह्यूमर’ जॉनरमधला उत्कृष्ट म्हणता येईल असा होता. वाळवीला इतकी जबरदस्त माऊथ पब्लिसिटी मिळाली तरी सिनेमानं काही भरपूर कोटी कमावले नाहीत हेही सत्यच, माऊथ पब्लिसिटीनंतरही सिनेमा बऱ्याच थिएटरमध्ये उपलब्ध नव्हता, त्यामुळे नंतर झी 5 वर आल्यावर बऱ्याच प्रेक्षकांनी पाहिला.

पहिल्या वीकेंडला साडेसहा कोटींची कमाई!
‌‘बाईपण’ने पहिल्याच आठवड्यात साडेबारा कोटींची कमाई केली. रिलीजच्या पहिल्या रविवारी एका दिवसांत साडेसहा कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. काय आहे ‌‘बाईपण’ मध्ये जे दिग्दर्शक केदारच्या ‌‘शाहीर’मध्ये नव्हतं? काय आहे या यशाचं कारण? या प्रश्नाचं उत्तर सिनेमाच्या ‌‘बाईपण’ असण्यात ठासून भरलेलं आहे. कथा अगदी साधी, मंगळागौरच्या निमित्तानं महिलांना एकत्र आणणारी, मात्र, त्याचवेळी त्यांच्यातल्या व्यथा आणि आत्मसन्मानाला जागवणारी. सिनेमात काही ट्रेंडिंगमधले सुपरस्टार नाहीत, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या ‌‘हिरोईन’ कॅटेगिरीत न गणल्या जाणाऱ्या मात्र कसलेल्या अभिनेत्री! या सगळ्यांनी सिनेमाला आपल्या अभिनयाच्या जोरावर उचलून धरलं, एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मर्स. सगळ्या आपापल्या जागी खऱ्या अर्थानं सुपरस्टार.

ट्रेलरनं केली यशाची मुहूर्तमेढ!
‌‘बाईपण’चा ट्रेलर यू ट्यूबवर तूफान व्हायरल झाला आणि तेव्हाच सिनेमाच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली गेली, ट्रेलर पाहिल्या पाहिल्या महिला वर्गानं सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायचं निश्चित केलं. आणि हेच असतं कुठल्याही सिनेमाच्या यशाचं गमक! फक्त ट्रेलर किंवा टीझर पाहून प्रेक्षकाला वाटावं की हा सिनेमा आपण थिएटरमध्ये जाऊनच पाहायचा. प्रेक्षकाला बाकी कुठल्याही गोष्टीची भूरळ पडत नाही. बऱ्याचदा ट्रेलर सिनेमाच्या यशाची पायाभरणी करतो. पण, ट्रेलर जबरदस्त असला तरी सिनेमात पाहण्याजोगं काही नसलं तर प्रेक्षक पहिल्या वीकेंडलाच सिनेमाकडे पाठ फिरवतात हाही अनुभव आहे, नुकतंच ‌‘घर बंदूक बिर्याणी’च्या वेळी हे घडलं. ट्रेलर जबरदस्त होता पण सिनेमानं फार काही चांगली कमाई केली नाही.

‌‘बाईपण’ ने एका विशिष्ट वर्गाला आकृष्ट केलं ही टीकाही झाली, ती काहीअंशी खरी असली तरी, शेवटी सिनेमाच्या यशापयाशाची किंमत मोजली जाते ती बॉक्स ऑफिस कलेक्शनवर! त्यामुळे कुणाला सिनेमा आवडला किंवा कुणाला नाही यापेक्षा सिनेव्यावसायिकांना महत्त्वाची गोष्ट हीच की, प्रेक्षकांनी थिएटरमध्ये सिनेमासाठी गर्दी केली! त्यासाठी कुठल्या मीम्सचा किंवा सोशल मीडियावर द्राविडी प्राणायाम करण्याची गरज भासली नाही.

मात्र, ‌‘बाईपण’च्या निर्मात्यांनाही सिनेमाच्या यशाबद्दल साशंकता होती. त्यामुळे त्यांनी हा सिनेमा जीओ सिनेमाला विकून स्वतःचे पैसे काही ठराविक फायद्यासकट मोकळे करून घेतले. त्याला कारण म्हणजे मराठी सिनेमाला न मिळू शकणारी थिएटर्स आणि जरी थिएटर्स मिळाली तरी प्रेक्षक येतील की नाही ही निर्मात्यांच्या मनातील धाकधूक. अवघ्या चार-पाच कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमानं आतापर्यंत सत्तर कोटींचा धंदा केलाय आणि तब्बल 24 दिवस सिनेमा थिएटरमध्ये ठाण मांडून आहे. सहसा मराठी सिनेमा पहिल्या दोन तीन दिवसातच थिएटरमध्ये प्राण सोडतो मात्र, बाईपण पाहायला महिला सजून-धजून सिनेमा पाहायला येताहेत. फक्त महिलांच्या सिनेमाला येण्यानं काहींनी नाक मुरडलीही असतील पण, सिनेव्यावसायिकांसाठी ‌‘नाळ’ नंतर हा पहिला सिनेमा आहे ज्याकडून अपेक्षा नसताना सिनेमानं धमाल उडवून दिलीय. सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेच आहे त्यामुळे हा सिनेमा 100 कोटीच्या क्लबमध्ये जाणार हे निश्चित!

मराठी सिनेमा आणि एसटीडी पीसीओ!
बाईपण इतक्या दणक्यात चालतोय मात्र, मराठी सिनेमासाठी यशाची ही टक्केवारी फक्त एखाद दोन टक्के म्हणता येईल इतकीच आहे, मराठी सिनेमा का चालत नाही? याचं कारण आहे, इथली जुनी खोडं! अमूक जॉनरचा सिनेमा चालतो अमूक नाही, याच हीरो-हीरोईनला पाहायला लोक येतात याला नाही, असे ठरावीक ठोकताळे मांडून त्यांनी सिनेसृष्टीचं नुकसान केलं. त्यांच्यालेखी मराठी सिनेमा ‌‘अस्सा’ केला तरच चालतो ‌‘अस्सा’ केला तर चालतच नाही! या टोळीनं यांच्या कंपूशाहीनं मराठी सिनेमात प्रयोग होऊ दिले नाहीत. सैराट चालला, चला मग सगळे सिनेमे गावखेड्यातच बनवू, गेल्या पाचेक वर्षात सैराटच्या किती भ्रष्ट आवृत्ती आल्या याची गणतीच नाही. खुद्द अनुराग कश्यप म्हणाला, सैराटनं मराठी सिनेसृष्टीचं जबर नुकसान केलंय. सैराटच्या आवृती म्हणजे एकानं एसटीडी-पीसीओ टाकला की शेजारी अजून दहा जणांनी तशीच दुकानं उघडण्यासारखं झालं! अर्थात सिनेमाची काही जॉनर्स निश्चित असतात जी पाहण्यासाठी विशिष्ट लोक येतातच येतात. आठवा बरं, दादा कोंडकेंचे सगळे सिनेमे का चालले? अगदी गिनिज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव जाण्याइतपत यश का मिळवलं? दादांचे सिनेमे पाहणारा एक विशिष्ट वर्ग होता, दादांना त्याबाबत माहिती नव्हतं अशातला भाग नाही, दादासुद्धा म्हणायचे पांढरपेशा समाजासाठी माझा सिनेमा नाहीच, माझा सिनेमा पाहणारा माझ्यासारखा गावाखेड्याकडचा रांगडा समाज आहे तो माझा सिनेमा पाहायाला बैलगाडी करून शहरात येईल आणि तसंच व्हायचं! जसा, सचिन, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सिनेमांनी एक काळ गाजवला तसाच, एक काळ ‌‘रडारडी’च्या सिनेमांनीही गाजवला. ‌‘लेक चालली सासर’ला पासून ते ‌‘माहेरची साडी’ हे सिनेमे सुपरहिट करणारा प्रेक्षक हा सिनेमागृहात येऊन रडारड करायचा किंवा ती रडारड पाहायलाच बायाबापड्या यायच्या. माहेरची साडीपासून ते झिम्मापर्यंत आणि आता बाईपण सिनेमापर्यंत मराठी सिनेमानं एक मोठा पल्ला गाठलाय, या सिनेमांनी महिला प्रेक्षकांची नाडी बऱ्यापैकी ओळखलीय. लेक चालली सासरला, माहेरची साडी ते झिम्मा आणि बाईपण या सिनेमांमधला महत्त्वाचा फरक म्हणजे एकता कपूरच्या आणि तत्सम मराठी सीरियल्समधून इतकी रडारड प्रेक्षकांंनी पाहून झालीय की, आता मराठी स्त्रीया रडारड पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत नाहीत. त्यांची ती गरज डेलीसोपधील ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील राधिका आणि ‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधती पूर्ण करते.. झिम्मा आणि बाईपण ने मराठी स्त्रीयांसाठी नवा जॉनर तयार केलाय, बायकांच्या स्ट्रगलचा जॉनर! आता याला काय म्हणता येईल? मी त्याला ‌‘वीमेन इम्पावरमेंट जॉनर’ असं नाव देतो. या जॉनरनं मराठी सिनेमाला तात्पुरते का होईना अच्छे दिन आणले हे मात्र नक्की. मात्र, पुन्हा आता एसटीडी-पीसीओसारखं सगळ्यांनी याच जॉनरच्या सिनेमांचा भडीमार करू नये म्हणजे मिळवली!

Exit mobile version