मराठी माणूस म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात संघर्ष आलाच
। मुबई । वार्ताहर ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जीएसटी भवनाच्या पाठोपाठ मराठी भाषा भवनाचं देखील भूमीपूजन केल. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात “जो इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही; मराठी माणूस म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात संघर्ष आलाच.” असं बोलून दाखवलं. मराठी भाषा भवन चर्नी रोड गिरगाव येथे उभारण्यात येत आहे.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी माणूस म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात संघर्ष हा आलाच. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झाली, एक एक प्रांत मिळाला त्या प्रत्येक प्रांताला राजधानी मिळाली. मात्र मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला आपली राजधानी मुंबई ही मिळाली नाही तर ती लढून, रक्त सांडून, बलिदान देऊन मिळवावी लागली हा इतिहास आहे. त्याचं सुद्धा एक दालन आपण शिवाजी पार्क येथे केलेलं आहे, ते मला आणखी मोठं करायचं आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही.”
प्रशासकीय मराठी भाषाही सोपी हवी –
याशिवाय, “प्रशासकीय मराठी भाषाही सोपी हवी. व्यपगत, नस्ती सारखे शब्द कळायला कठीण. हे काम सुभाष देसाई यांनी हाती घेतल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे ठणकावून सांगितले एवढेच नाही तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यांनी हे केलं नसतं तर आपण असतो की नाही, हा भगवा असता की नाही काही कळत नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचे खलिते ही सोप्या भाषेत केले.” असं देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.