मशागतींना वेग, महिनाभरात पेरणीचे नियोजन
| पेण | प्रतिनिधी |
परतीच्या पावसाने पेणमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले. यातून सावरत शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी करीत आहे. पेण तालुक्यात 2,100 एकरवर रब्बीची पिके घेतली जातात.
रोपवाटिकासाठी जमिनीची सफाई, तण काढणी ही मशागतीची कामे सुरू झाली आहेत. पुढील पंधरा दिवसांत ही कामे उरकून पेरणी करण्याचे शेतकर्यांचे नियोजन आहे. हेटवणे सिंचनाच्या ओलिताखाली 2100 एकरवर रब्बीची पिके घेतली जातात. कामार्ली, आधरणे, तळवली, सापोली, बोरगाव, रोडे, काश्मिरे, शेणे, शहापाडा धरणाजवळील रोडे काश्मिर, कांदळे, कांदळेपाडा हा 19 कि.मी.च्या पट्ट्यातील क्षेत्र ओलिताखालील आहे.
महिनाभरात होणार पेरणी
येथील शेतशिवारात पुढील 25 दिवसांत पाणी येणार असल्याने शेतकर्यांनी पेरणीची तयारी केली आहे. उन्हाळी भातशेती, भाजीपाला, फुलशेती व थोड्या प्रमाणात कलिंगड शेती येथे केली जाते. नवीन वर्षाच्या पंधरवड्यात लागवडीसाठी रोपे तयार होती, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कालव्याची कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा
हेटवणे कालव्याची कामे 19 किलोमीटर लांबीपर्यंत पूर्ण झाली असलेल्या या भागात दुबार शेती केली जाते. मात्र, उर्वरित कालव्याची कामे निधीअभावी गेले दीड दशकभर रखडली आहेत. गतवर्षी यासाठी 766 कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामे कधी सुरू करणार या प्रतीक्षेत पेणचा शेतकरी डोळे लावून बसला आहे. इंद्रनगर, नवेगाव, वडखळ, डोलवीपासून पुढे काराव, गडबच्या हद्दीपर्यंत दुबार शेती होऊ शकते; परंतु कालव्याची काम अपुरी असल्याने बळीराजा दुबार पीक घेऊ शकत नाही.