नगदी पिकातून आर्थिक स्थैर्याची आशा; कमी कालावधीत चांगला परतावा देणारे पीक
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
हिवाळ्याची सुरुवात झाली असून जिल्ह्यात अनेक भागांत भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यानंतर लगेचच रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कलिंगड लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. कमी कालावधीत चांगला परतावा देणारे हक्काचे नगदी पीक म्हणून कलिंगड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या शेतांची मशागत करणे आणि सिंचनाच्या नियोजनाला वेग आला आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने अलिबाग, पेण, माणगाव आणि रोहा परिसरात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड केली जाते. याशिवाय सुधागड आणि इतर तालुक्यांतील शेतकरीही आपल्या उपलब्ध क्षेत्रानुसार आणि जलस्रोतांवर कलिंगड पिकाची निवड करतात. जिल्ह्यातील काही भागांत पारंपरिक लाल कलिंगडासोबतच ‘आरोही’सारख्या पिवळ्या गराच्या वाणाची लागवड आणि ‘पिक युअर ओन’सारख्या कृषी-पर्यटन संकल्पनांचेही प्रयोग यशस्वी ठरले आहेत. मागील हंगामात रोहा तालुक्यातील शेतकरी ऋषिकेश म्हात्रे व प्रवीण म्हात्रे यांनी हा प्रयोग यशस्वी केला होता. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली कलिंगडे चवीला अधिक गोड व पौष्टिक मानली जातात. पिवळ्या कलिंगडात बीटा-कॅरोटीन व अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते, तर कमी कालावधीत मिळणारे हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लावते. दरम्यान, बदलत्या हवामानाचा आणि पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करत यंदाच्या हंगामात शेतकरी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पाऊल टाकत आहेत. पारंपरिक पद्धतीसोबतच सेंद्रिय घटकांचा वापर आणि आधुनिक जलसिंचनावर भर दिला जात आहे. भात कापणीनंतर रिकाम्या होणाऱ्या शेतांचा योग्य वापर करून योग्य मशागत व पाणी नियोजन साधल्यास कलिंगड हे रायगडच्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. असे कृषी तज्ञ अमित निंबाळकर यांनी सांगितले.
नवीन हंगाम, नवा प्रयोग आणि नवे शिकणे! यंदा प्रथमच ठिबक सिंचनाचा वापर करून कलिंगड आणि हंगामी भाजीपाला लागवड करत आहे. पाण्याची टंचाई हे आव्हान बनत असताना, अधिक नियोजनाबद्धपद्धतीने शेती करून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कलिंगड पिकातून चांगले उत्पन्न मिळते मागील दोन वर्ष घरपोच विक्री केली होती.
तुषार केळकर,
शेतकरी, उद्धर
