श्रीमंत कोकाटेंची शासनाकडे मागणी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा
। सातारा । प्रतिनिधी ।
दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, हे सिद्ध झाले असतानाही गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात तसा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांची बदनामी करणारे लिखाण केले आहे. या पुस्तकाचा भाजप, काँग्रेसने निषेध केला असला तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने त्याबाबतची भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांनी ती भूमिका जाहीर करत या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनी केली. तसे न झाल्यास लोकशाही मार्गाने राज्यभरात निषेध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी वंचित आघाडीचे चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, आदिनाथ बिराजे उपस्थित होते. कोकाटे म्हणाले, ङ्गरेनिसांस स्टेटफ या पुस्तकाचा लोकशाही मार्गाने राज्यभरात निषेध करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते, असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. त्यांचे लिखाण संशोधन पद्धतीचे नियम न पाळणारे असून कुबेरांचे हे पुस्तक पुरंदरेंचा इंग्लिश अवतार आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली असून त्यातील मांडणी धादांत खोटी आहे. संभाजीराजेंना कमी दाखवत संधी विकृतीची मांडणी केली आहे.
पेशव्यांची छत्रपती शिवरायांशी केलेली तुलना आक्षेपार्ह आहे.फ या पुस्तकात बहुजन समाजाला दिशा देणार्या समाजसुधारकांचा नामोल्लेख टाळत जातीयवादी विचारधारा जोपासणार्या व्यक्तींचा उदोउदो केला आहे. हे पुस्तक जातीयवादाने भरलेले असून त्यातील पानापानांत कुबेरांनी विकृतीचे दर्शन घडवले आहे. या पुस्तकावर शासनाने बंदी आणावी, कुबेर यांच्यावर कारवाई करावी.
खासदार उदयनराजेंची भेट घेणार
या पुस्तकातील पानापानांवर छत्रपतींची बदनामी करण्यात आली आहे. हे पुस्तक संधी विचारधारेला वाहिलेले असून 2024 साली संघी मनोवृत्तीने अस्तित्वात आणण्याचा चंग बांधलेल्या हिंदू राष्ट्राच्या प्रक्रियेला चालना देणारे आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने खासदार उदयनराजेंची भेट घेणार असल्याचेही कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
पुस्तक सनातनी विचार, जातीयवादाने भरलेले
हे पुस्तक सनातनी विचार व जातीयवादाने भरले आहे. कुबेरांमध्ये सुसंस्कृतपणा शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून पुस्तक मागे घ्यावे. महाविकास आघाडीने या पुस्तकावर बंदी घालून कुबेर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.