‘या’ तारखेपासून समुद्रात मासेमारीला बंदी

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यातील सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि मासळीच्या प्रजनन काळाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यंदाही पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये 1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्याच्या क्षेत्रीय सागरी जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सलग 61 दिवस लागू राहणाऱ्या या बंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी केले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले की, पावसाळ्यात मासळीच्या विविध प्रजातींचा प्रजनन काळ सुरू असतो. या काळात मोठ्या प्रमाणावर यांत्रिक पद्धतीने मासेमारी झाल्यास मत्स्यसंपत्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी केवळ यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांनाच लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना त्यातून सूट देण्यात आली आहे.

1 जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक
सध्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांनी 1 जून 2026 पूर्वी संबंधित मासेमारी बंदरात परतणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच बंदी कालावधीत म्हणजेच 31 जुलैपर्यंत अशा नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. बंदी काळात राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी नौकांच्या अवागमनावरही निर्बंध राहणार आहेत.
12 सागरी मैलांपर्यंत बंदी लागू
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात म्हणजे किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. या क्षेत्रात कोणतीही यंत्रचलित किंवा यांत्रिक नौका मासेमारी करताना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, 12 सागरी मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी केंद्र शासनाचे स्वतंत्र धोरण आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई
पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कलम 14 नुसार मासेमारी करताना आढळलेल्या नौका, त्यावरील यंत्रसामुग्री, मासेमारी साहित्य तसेच नौकेत सापडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय कलम 17 मधील तरतुदीनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.
अपघात झाल्यास नुकसान भरपाई नाही
बंदी काळात नियम मोडून समुद्रात मासेमारीस गेलेल्या यंत्रचलित अथवा यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत अथवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचेही मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नौकामालक आणि मच्छीमारांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहकारी संस्थांना प्रशासनाचे आवाह
जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्था, नौकामालक, सभासद आणि संबंधित घटकांनी या आदेशाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाकडून किनारी भागात विशेष पथकांमार्फत देखरेख आणि तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
Exit mobile version