महेश मांजरेकरांच्या चित्रपटावर बंदी घाला

शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई | प्रतिनिधी |
चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवीन मराठी चित्रपट ’नाय वरण भात लोणचा, कोण नाय कोणाचा’ या चित्रपटाची जाहिरात यूट्यूबवर दाखविण्यात येत आहे. प्रसिद्धीसाठी मराठी संस्कृतीवर घाला घालणारे, विभस्त दर्शन घडवणारे चित्रपट बनविणे अशोभनीय आहे. या अश्‍लील चित्रपटावर बंदी आणावी तसेच युट्युबवर असलेली जाहिरात कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.
दोन शाळकरी मुले या चित्रपटाची मुख्य पात्र असून, ही दोन शाळकरी मुले खून करताना, स्वतःच्या काकीबरोबर शारीरिक संबंध करताना दाखविली आहेत. या चित्रपट जाहिरातीमधून सामाजिक संदेश देण्याऐवजी लहान मुलांना गुन्हेगारीविश्‍वाकडे ढकलले जात असल्याचे दिसून येते. सख्ख्या काकीबरोबर शारीरिक संबंध ही आपली संस्कृती नसून, चित्रपटाच्या माध्यमातून अशा पवित्र नात्याची अवहेलना आणि भारतीय संस्कृतीचे तसेच मराठी संस्कृतीचे चुकीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
एकीकडे आपण ‘पोस्को’, ‘शक्ती’सारखे कायदे निर्माण करून अशा प्रकारचे गुन्हे नष्ट करण्याच्या, संपविण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे ‘नाय वरण भात लोणचा, कोण नाय कोणाचा’सारखे चित्रपट प्रदर्शित करून सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत असल्याचे दिसून येते.
या अश्‍लील चित्रपटावर बंदी आणावी तसेच युट्युबवर असलेली जाहिरात कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणी सानपाडा 79 प्रभागचे शिवसेना शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली असून, या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिल्या आहेत.

Exit mobile version