Pandharpur News: खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मांस विक्रीवर बंदी

| पंढरपूर | प्रतिनिधी |

आषाढी वारीसाठी पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात उद्यापासून (दि. 15) थेट 29 जुलैपर्यंत असे 15 दिवस मांस आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पंढरपुरातील खवय्यांची कोंडी होणार असली, तरी लाखो वारकरी आणि भाविकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे.

आषाढी यात्रेच्या काळात दररोज लाखो वारकरी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पायी चालत येत असतात. या पवित्र काळात शहरातील विविध भागांत सुरू असणाऱ्या मांस आणि मटण विक्रीमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, पुढील 15 दिवस म्हणजेच 15 जुलै ते 29 जुलै या वारीच्या काळात पंढरपूर शहर आणि परिसरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version