कोळसा भट्ट्या वापरण्यावर बंदी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील तंदुरी पदार्थांची चव लवकरच अडचणीत येऊ शकते. याचे कारण ग्लोबल वार्मिंगमुळे वायू प्रदुषणाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. मुंबईतही हिवाळ्याच्या दिवसात हवेचा स्तर खालावला होता. शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे सर्व बेकरी, हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यांमध्ये कोळशावर चालणार्या तंदूर भट्ट्या बंद करणार्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कोळसा भट्टीवरील तंदूर रोटीसह मुंबईची ओळख असलेला वडापावचादेखील आनंद घेता येणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तंदूर रोटी, चिकन याचबरोबर बटाट वड्यासोबत आवडीने खाल्ला जाणारा पाव हे खवय्यांचे आवडीचे पदार्थ आहेत. कोळशाच्या भट्टीत तंदूर भाजली जाते. मात्र, आता मुंबईकरांना तंदूर रोटी खाता येणार नाही. कोळशाऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. तसेच, तंदूर भट्टी वापरणार्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट हॉटेलला पालिकेकडून नोटीस देण्यात आली असून 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूरभट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या पुढे खवय्यांना तंदूर रोटी, नान आणि तंदूर चिकन खाता येणार नाही. तसेच, मुंबईची ओळख असलेला वडा-पावदेखील हरवणार का, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पालिकेने बेकरी चालकांनादेखील नोटीस बजावली आहे. बेकरीत प्रामुख्याने पाव भट्टीत भाजले जातात. त्यामुळे बटाटावड्यासोबत दिला जाणार्या पावाची ओळख हरवणार का? अशी भिती खवय्यांकडून व्यक्त केली जात आहे.
300 बेकर्यांमधून निघतोय विषारी वायू
मुंबईत गेल्या काही वर्षांत प्रदूषणात वाढ झाली आहे. विशेषतः बांधकामांची धुळ आणि बेकर्यांसह ढाबे, हॉटेलमध्ये जळणासाठी वापरले जाणारे लाकूड आणि प्लायवूडमधून मानवी शरीरासाठी घातक असलेला विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे या भट्ट्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. पालिकेने केलेल्या झाडाझडतीत मुंबईत सुमारे 300 बेकर्यांमध्ये जळणासाठी लाकूड, प्लायवूडसारखे पदार्थ वापरले जात असल्याचे समोर आले आहे.
कठोर कारवाईचा इशारा
मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि ढाबा चालकांची संख्या 1 हजारांच्या पुढे असून बहुतांश चालक हे विद्युत उपकरणांचा वापर करत असतात. मात्र, काही ठिकाणी अजूनही कोळसा भट्टीचा वापर केला जातो. त्यामुळे महापालिकेने याची दखल घेतली असून रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे, दंड आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाणार आहे.