चारा वाहतूक, विक्रीवर बंदी

इतर जिल्ह्यासह राज्याबाहेर होणारी विक्री रोखणार; जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश जारी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्ह्यात पावसाअभावी चाऱ्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांसह गुजरात राज्यात होणाऱ्या चाऱ्याच्या वाहतूक व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी मिळालेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाने उशीरा हजेरी लावली. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली. ऐन भात पिकांच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने भात पिक पिवळे पडू लागले आहेत. त्यामुळे भात पिकांसह चाऱ्याचाही तुटवडा निर्माण होण्याची भिती अनेकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील चारा साधारपणे गुजरात राज्यासह अन्य जिल्ह्यात पाठविला जातो. 2019 च्या पशुगणनेनुसार, रायगड जिल्ह्यात 1 लाख 76 हजार 906 गायी, 90 हजार 188 शेळी, 62 हजार 225 म्हैस आणि 2 हजार 203 मेंढी इतके पशूधन आहे. मात्र, यावर्षी चाऱ्याची वाहतूक व विक्री अन्य जिल्ह्यासह राज्यात न करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर कडबा, कुट्टी, पेंढा यांसह सर्व प्रकारच्या ओल्या व सुक्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि संभाव्य चारा टंचाईवर नियंत्रण ठेवणे असेही आदेश पशुधन विभागाला देण्यात आले आहेत.

Exit mobile version