ठाणे महापालिकेचा निर्णय
। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसेच, गृह संकुलांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात टँकरद्वारे होणार्या पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराकत दररोज 585 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी शहरातील विविध परिसर तसेच गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होताना दिसून येते.
ठाणे महापालिकेच्या मालकीचे तीन टँकर आहेत. याशिवाय, पालिका पाच खासगी टँकर भाडेपट्ट्यावर घेते. अशा एकूण आठ टँकरद्वारे ठाणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग शहरातील टंचाईग्रस्त परिसर आणि गृहसंकुलांना मागणीनुसार विनामुल्य पाणी पुरवठा करतो. साकेत येथील पाणी केंद्रावरून पाणी उचलून त्याचा शहरात या टँकरद्वारे पुरवठा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी पालिककेडे टँकरद्वारे पाण्याची मागणी केली जाते आणि त्या पाण्याचा वापर रंगपंचमी खेळण्यासाठी केला जातो, अशी बाब यापूर्वी ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ठाणे महापालिका रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवते. यंदाही ठाणे महापालिकेने हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे ठाण्यात रंगपंचमीच्या दिवशी टँकरद्वारे होणार्या पाणी पुरवठ्यास बंदी असणार आहे.
ठाणे महापालिकेकडून टँकरद्वारे होणार्या पाण्याचे रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता असते. हा अपव्यय टाळण्यासाठी यंदाही शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
– विनोद पवार, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका