। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत महावाचन उत्सव 2024 राबविण्यात आला. हा उप्रकम अलिबाग तालुक्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते बारावीमध्ये शिकत असणार्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला. यासाठी गट ‘अ’ इयत्ता 3 री ते 5 वी, गट ‘ब’ इयत्ता 6 वी ते 8 वी, गट ‘क’ इयत्ता 9 वी ते 12 वी अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमामध्ये विद्यार्थी त्यांच्या आवडीची अवांतर वाचनाची कथा, कादंबरी, नावाजलेल्या लेखकांचे साहित्य वाचन करत त्यातील मनोगत स्वतःच्या शब्दांत लिहिण्यात आले.
यावेळी जिल्हास्तरीय ‘क’ गटात आस्था म्हात्रे (कोएसो माध्यमिक शाळा शहाबाज) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, तनिषा ठाकूर (जा.र.ह. कन्या शाळा अलिबाग) हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच, तालुकास्तरीय ‘अ’ गटात प्रथम क्रमांक वृत्ती नाईक (राजिप शाळा चौल-दादर), द्वितीय क्रमांक ओवी मढवी (राजिप शाळा सराई), तृतीय क्रमांक मृणमयी पाटील (राजिप शाळा पेझारी) यांनी मिळविला आहे.‘ब’ गटात प्रथम क्रमांक प्रथम पाटील (राजिप शाळा मेढेखार), द्वितीय क्रमांक अनय मुकादम (राजिप शाळा चौल दादर), तृतीय क्रमांक समीक्षा लोंढे (राजिप शाळा झिराड) यांनी पटकावला आहे. तर, ‘क’ गटात प्रथम क्रमांक आद्या म्हात्रे (कोएसो शहाबाज), द्वितीय क्रमांक स्वरूप म्हात्रे (कोएसो हायस्कूल भिलजी) व तृतीय क्रमांक राधिका वर्तक (सं.मं. हायस्कूल नागांव) यांना मिळाला आहे. यावेळी तालुकास्तरीय गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना गटशिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा यांच्या हस्ते विविध लेखकांची पुस्तके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तालुक्यातील महावाचन उत्सव उपक्रम राबवण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ती, सर्व विशेष शिक्षक यांनी मोलाचे योगदान दिले.