ग्राहक वर्गातून तीव्र संताप
। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब परिसरातील विज ग्राहकांना विज बिल भरण्याची अंतिम तारीख संपल्याानंतर महावितरण कंपनीकडून बिल मिळत आहेत. त्यामुळे विज ग्राहकांना अतिरिक्त विज आकार भरावा लागत आहे. त्याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया विज ग्राहकांकडून होत आहे. तसेच, महावितरण कंपनीचा मनमानी कारभार चालू असल्याची चर्चा देखील होत आहे.
महावितरण कंपनीने विज बिल वाटप करण्यासाठी कंत्राटी कामगार ठेवण्यात आले आहेत. त्यांना एका बिलाप्रमाणे ठराविक दर ठरवून दिले आहेत. परंतु, हे कामगार इतर ठिकाणी काम करून त्यांच्या सुट्टीच्या वेळात विज बिल वाटप करीत असल्याचे निदर्शनास येत आहेत. काही ठिकाणी विज बिल भरण्याची तारीख संपल्यानंतर बिलं मिळत आहेत. त्यामुळे विज ग्राहकांना अतिरिक्त विज बिल भरावे लागत आहे.
या आधी महावितरण कंपनीकडून तीन महिन्यांनी विज बिल येत होते. त्यानंतर दोन महिन्यांनी तर काही वर्षापासुन ते विज बिल एक महिन्यांनी येऊ लागले आहे. परंतु, तीन महिन्यांनी येणार्या विज बिलापेक्षा जास्त विज बिल एका महिन्याला येत आहे. त्यामध्ये 34 युनिटला 160.14 रुपये होतात. परंतु, यामध्ये स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, 16% विज शुल्क याचे जवळ जवळ 230 रुपये असे एकूण 390 ते 400 रुपये विज ग्राहकांना लादले जातात. त्यामुळे विज बिल भरता भरता विज ग्राहकांचे पार कंबरडे मोडले आहे. यामध्ये विज बिल भरण्यासाठी विलंब झाला तर अतिरिक्त स्थिर आकार भरावा लगत आहे.