। रेवदंडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील साळाव चेकपोस्ट ते बोर्ली या मार्गात रविवारी (दि.9) रात्री सव्वाबाराच्या सुमारास झीशान उलहक वसीम सातारकर (25) याने पिकअप टेम्पो वाहतुकीला अडथळा येईल अश्या पद्धतीने उभा केला होता. त्यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा. फौजदार दिनेश पिंपळे यांनी झीशान सातारकर व सर्वेश ठाकूर या दोंघाना रेवदंडा पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी त्या दोघांनी फौजदार दिनेश पिंपळे यांच्याशी वाद घालून अरेरावीची भाषा केली. दरम्यान, दिनेश पिंपळे हे पिकअपमधून गाडीची कागदपत्रे आणण्यासाठी गेले असता झीशान उलहक वसीम सातारकर याने त्यांचे शर्ट खेचून हाथाबुक्काने मारहाण केली. तसेच, हातातील दगड डावे हाताच्या त्यांच्या पंजावर मारून दुखापत केली. तसेच, सर्वेश ठाकूर हा देखील दिनेश यांच्या मारहाणीसाठी धावून गेला. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात पिकअप टेम्पो मालक झीशान उलहक वसीम सातारकर व सर्वेश सुनिल ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई दगडू गांगुर्डे हे करत आहेत.