। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील महेश निरगुडा यांनी त्यांच्या बँकेतून 23 हजार रुपये काढले आणि दुसर्या बँकेत ठेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्लिप भरत असताना दोन अज्ञात पुरुष त्याठीकाणी आले आणि त्यांनी महेश यांना बँकेत किती पैसे भरायचे आहेत, असे विचारले. त्यावर त्यांनी 18 हजार रुपये भरायचे आहेत, असे सांगितले. त्यावेळी त्या दोन अज्ञात पुरूषांनी महेश निरगुडा यांना बँकेच्या बाहेर आणले आणि आपल्याजवळ 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या खिशातून रुमालात बांधलेले बंडल निरगुडा यांना दाखवले आणि ते त्यांच्या हातात दिले.
त्यावेळी निरगुडा यांच्याकडून त्यांनी 23 हजार रुपये घेतले व रुमालात बांधलेले 1 लाख 20 हजार रुपये तुझ्याजवळ ठेव असे बोलून ते दोघे निघून गेले. त्यानंतर निरगुडा यांनी तो रुमाल सोडून पाहिला असता त्यात वरील बाजूला पाचशे रुपयाची नोट होती आणि खालील बाजूला कागदे लावलेली होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश निरगुडा यांनी त्या दोन अनोळखी व्यक्तींच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.