राजकीय पोस्टर्सवर प्रतिबंध घाला- आदित्य ठाकरे

। मुंबई । प्रतिनिधी ।

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळात प्रत्येक शहराच्या कानाकोपर्‍यात लावण्यात येणार्‍या हजारो पोस्टर्स, बॅनर आणि होर्डिंगमुळे शहरांमध्ये बकालपणा येत आहे. त्यामुळे 2025 या नव्या वर्षात लोकसेवेचा संकल्प करताना राजकीय पोस्टर, बॅनर आणि होर्डिंगवर प्रतिबंध घालण्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घ्या, असे आवाहन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

गेल्या दोन वर्षांत राजकीय गोंधळ सुरू असताना राजकीय होर्डिंगचेही पेव फुटले आहे. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत, मात्र आपल्याकडे अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या होर्डिंग लावण्यात येत आहेत. यामुळे शहरे विद्रूप होत आहेत. याचा एक नागरिक म्हणून खेद वाटतो, असे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

होर्डिंगवर प्रतिबंध घातल्यास आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल. याबाबत ठोस निर्णय घेतल्यास आपण आपल्या पाठीशी राहू, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आपण सत्तेत मुख्यमंत्री आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून असलो तरी या गोष्टींवर आपण एकत्र काम केलेच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. आपण याविषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version