मराठी पाट्या न लावणाऱ्यांना दणका

351 दुकानांना पालिकेने बजावल्या नोटिसा

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका हद्दीतील चारही प्रभागांमधील मराठी नामफलक नसलेल्या 351 दुकाने व आस्थापानांना आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक प्रभागात स्पीकरद्वारे घोषणादेखील केली जात आहे.

ज्या आस्थापनांनी अजूनही अमराठी पाट्या बदलल्या नाहीत, अशा आस्थापनांचा प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण सुरु असून, त्यांना महापालिकेकडून कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. गेल्या शनिवारपासून नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, प्रभाग अ, ब, क, ड मधील सुमारे 351 दुकाने तसेच आस्थापनांना आतापर्यंत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याकरिता उपायुक्त गणेश शेटे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक सूचनाही दिल्या होत्या. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकाने व आस्थापनांवरील नामफलक फक्त इंग्रजीत व अन्य भाषेत आहेत. काही फलकांवर नावे मराठी भाषेत लिहिलेली जरी असली तरीही ती औपचारीकता म्हणून कोपऱ्यात लहान अक्षरात लिहिलेली आहेत. नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक हे ठळक मराठी (देवनागरी) लिपीत असावे, त्याचप्रमाणे इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावे असे नमूद आहे. त्यामुळे दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांना पालिकेकडून कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Exit mobile version