। रावळपिंडी । वृत्तसंस्था ।
बांगलादेशने क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात मंगळवारी शेवटच्या दिवशी या संघाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. बांगलादेशकडून लिटन दासने पहिल्या डावात शतक झळकावले. बांगलादेशने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 10 विकेट्सने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. यासह नझमुल हुसैन शांतोच्या नेतृत्वाखालील संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. याआधी उभय संघांमध्ये 5 कसोटी मालिका खेळल्या गेल्या होत्या आणि त्या सर्व पाकिस्तानने जिंकल्या होत्या. दोन्ही संघ 2001 मध्ये पहिल्यांदा कसोटी खेळले होते.
पाकिस्तानी संघ सोमवारी दुसर्या डावात 172 धावांत सर्वबाद झाला. संघाने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य दिले होते. मंगळवारी बांगलादेशने आपला दुसरा डाव 42 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार नझमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हक यांच्यात 57 चेंडूत 119 धावांची भागीदारी झाली. संघाकडून झाकीर हसनने 40, शांतोने 38, मोमिनुलने 34, शदमान इस्लामने 24 धावा केल्या. रविवारी सामन्याच्या तिसर्या दिवशी बांगलादेशचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 262 धावांवर आटोपला. एकवेळ संघाने 26 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. येथे लिटन दास आणि मेहदी हसन यांनी 165 धावांची भागीदारी करत संघाला 190 च्या पुढे नेले. लिटनने 138 आणि मेहदी हसनने 78 धावा केल्या. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने 6 बळी घेतले.