। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सचिवपदी अभय हडप यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत हडप यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सूरज सामत यांना 196-141 अशा फरकाने पराभूत केले. या निवडणुकीत 337 सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अजिंक्य नाईक हे एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर सचिवपद रिक्त झाले होते. विशेष म्हणजे हडप आणि सामत दोघेही कार्यकारी परिषदेचे सदस्य असल्याने आता पुन्हा एकदा लवकरच एमसीएमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.
माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी कधी सचिव होईल, असा विचारही केला नाही. आता या पदावर आल्यावर पायाभूत सुविधा आणि मैदान, तसेच कर्मचार्यांसाठी मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. माझ्याकडे आता एका वर्षाचा कालावधी आहे. मुंबई क्रिकेट आणि मैदानांसाठी हा कार्यकाळ पुरेसा आहे. मी आता अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि कार्यकारी परिषदेच्या सदस्यांसह मुंबई क्रिकेटला आणखी उंचीवर नेण्यासाठी मेहनत करेन, असे हडप यांनी सांगितले.
वरळीच्या आदर्श नगर येथील रहिवासी असलेले हडप मुंबईच्या मैदानात वर्षभर स्पर्धांचे पद्धतशीर आयोजन करण्यासाठी ओळखले जातात हडप यांनी गेली 25 वर्षे मैदान क्रिकेटमध्ये काम पाहिले आहे. मी लहान असताना अजित नाईक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळलो आहे. ही स्पर्धा सुरू करणार्यांपैकी ते एक होते. आजही ते या स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवतात. गेल्या हंगामात एमसीए स्पर्धांच्या आयोजनातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती, असे एमसीएफ अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.