स्थानिकांचे सहकार्य, नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्य
| अलिबाग | प्रमोद जाधव |
नोकरी व्यवसायानिमित्त रायगडमध्ये बांगलादेशींचा वावर वाढू लागला आहे. दहा वर्षात 49 बांगलादेशींना पकडण्यास रायगडच्या बांगलादेशी विरोधी पथकाला यश आले आहे. बेकायदा बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या 40 स्थानिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये कंत्राटी कामगार, बांधकाम व्यवसायिक, मासेमारी नौकांवर काम करण्यासाठी बांगलादेशी रायगडात येत असल्याचे चित्र आहे.
खालापूर, अलिबाग, पोयनाड अशा अनेक भागात नोकरी व्यवसायानिमित्त ते राहत असून त्यांनी आधारकार्डही मिळविले आहे. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेशी विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व सात कर्मचारी असे आठ जण कार्यरत आहेत. 2013 पासून ऑगस्ट 2023 या दहा वर्षाच्या कालावधीत 49 बांगलादेशींना पकडण्यास यश आले आहे. त्यात वीस महिला व 29 पुरुषांचा समावेश असून त्यांचे वय 20 वर्षापासून 45 वर्षापर्यंत आहे. यांच्याविरोधात 19 गुन्हे दाखल केले आहेत. 41 जणांना न्यायालयात हजर करून त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार परत पाठविण्यात आले आहेत. पाच जणांची जामीनावर सुटका करण्यात आली असून काहींची निर्दोष सुटका झाली आहे.
अधारकार्ड रायगडमधील स्थानिकांच्या मदतीने भाड्याने राहत असून मिळेल त्याठिकाणी ही मंडळी काम करीत असतात. त्यांचे अधारकार्डही रायगड जिल्हयातील असते. मात्र प्रशासन याकडे गांभीर्यान लक्ष देत नाही. पोलीसांनादेखील खोटी माहिती देऊन आपला माणूस आहे, नोकरीसाठी आला आहे, असे सांगून काही ठेकेदार वेळकाढूपणा करीत असल्याचे अनेक वेळा घडत आहेत. याकडे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बोली भाषेवरून तिला पकडले.. खोपोली येथील फुडमॉल हा गर्दीचा परिसर आहे. या ठिकाणी एक महिला आली होती. तिच्या बोलीभाषेवरून ती दुसऱ्या राज्यातील वाटली. सुरुवातीला तेथील स्थानिकांनी दुर्लक्ष केले. तिच्या बोलण्यामध्ये बांगलादेशी सुर अधिक दिसून आले. त्यामुळे संशय बळावला. स्थानिकांनी पोलीसांशी संपर्क साधला. बांगलादेशी विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन महिलेची विचारपूस केली. तिच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, तिच्याकडे बोगस दाखले दिसून आले. तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्नी बांगलादेशी, नवराही अनभिज्ञ पोयनाड परिसरात एक महिला बांगलादेशी असून ती बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. या पथकाने छापा टाकून तिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केल्यावर ती बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या नावे रायगड जिल्ह्यातील अधार कार्ड असून तिचे पती पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. तो अलिबागमध्ये एका ठेकेदाराकडे काम करीत असून ही महिला गृहिणी आहे. दोघेही गेल्या 12 वर्षापासून पोयनाडला राहत होतेे. आपली पत्नी बांगलादेशी असल्याबाबत नवरा अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले आहे.