विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पाच दिवसांचा आठवडा करण्याबरोबरच इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी बँक कर्मचारी संपाच्या पावित्र्यात आहेत. येत्या 28 ते 30 सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत देशपातळीवर संप पुकारण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक कर्मचारी या संपात सामील होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर मागण्यांची दखल घेतली नाही, तर 26 ऑक्टोबरला बेमुदत संपाचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
बँक युनियन्सची संयुक्त कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. पाच दिवसाचा आठवडा करण्या यावा,सरकारची एकतर्फी आणि भेदभावपूर्ण पीएलआय योजना मागे घेण्यात यावी. तसेच या योजनेची अंमलबजावणी स्थगित ठेवण्यात यावी. कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून योजनेत सुधारणा करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसाठी बँक अधिकारी व कर्मचारी संप करणार आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 12 सरकारी बँका असून त्याअंतर्गत 322 शाखा येतात. त्यामध्ये 146 ग्रामीण, 89 निमशहरी आणि 88 शहरी शाखांचा समावेश आहे. 12 बँकासह त्याअंतर्गत येणाऱ्या 322 शाखांचा कामकाज 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील लाखो ग्राहकांच्या सेवेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सरकारी बँकाचे एटीएम व पैसे भरणा केंद्र असले तरी यावर मोठा भार पडणार आहे.त्यामुळे बँकेतील कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तीन दिवस होणाऱ्या संपाची दखल सरकारने घेतली नाही, तर 26 ऑक्टोबरला बेमुदत संपावर जाणार असा इशारा बँक युनियन्सची संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
