घोड्यांच्या दराची बॅनरबाजी

मूलनिवासी अश्‍वपाल संघटनेकडून बेकायदा फलक; पालिका पोलीस आणि वन विभाग अनभिज्ञ

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये घोड्यावरून पर्यटकांची वाहतूक व्यवस्था केली जाते. त्यासाठी शासनाने माथेरानमध्ये 450 घोड्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या अश्‍वपालकांना परवानगी दिली आहे. त्यांच्यावर शासनाचे बंधन असावे यासाठी शासनाच्या अधीक्षक कार्यलयाच्या माध्यमातून माथेरान नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून दरपत्रक निश्‍चित केले जात असते. असे असताना माथेरानमधील मूलनिवासी अश्‍वपाल संघटनेने दस्तुरी नाका येथे पर्यटकांसाठी दरपत्रक जारी केले आहे. दरम्यान, त्या दरपत्रकाबाबत माथेरान गिरिस्थान नगरपरिषद तसेच माथेरान पोलीस प्रशासनदेखील अनभिज्ञ असून, वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा असे फलक लावले गेले असल्याने शासनाच्या अधीक्षक कार्यालयाने दरपत्रक निश्‍चित करावे, अशी मागणी पुढे येत आहे.

माथेरान मध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी 450 घोड्यांना शासनाने परवानगी दिली आहे असे असताना त्यांना वेगेवगळत्या प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांना घेऊन जाण्याचे दरदेखील ठरवावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. मात्र, मागील काही वर्षात महसूल खात्याच्या अखत्यारीत माथेरान नगरपरिषद आणि माथेरान पोलीस यांच्याकडून तसे दरपत्रक निश्‍चित करण्यात आले नाहीत. त्यामुळे दरपत्रक निश्‍चित करण्याची मागणी स्थानिक अश्‍वपाल संघटना करीत असतात. मात्र, शासन करीत नाही तर आम्ही करणार अशा अविर्भावात मूलनिवासी अश्‍वपाल संघटनेने दस्तुरी नाका येथे स्वतःच्या निर्णयात प्रेक्षणीय स्थळांचे दरपत्रक निश्‍चित करून त्यांचे फलक लावले आहेत. मात्र शासनाच्या वतीने असे दर निश्‍चित करण्याचा अधिकार माथेरान नगरपरिषद आणि माथेरान पोलीस ठाणे यांना आहे. परंतु, माथेरानमधील मूलनिवासी अश्‍वपाल संघटनेकडून अशा प्रकारे दरपत्रक निश्‍चित करून शासनाच्या निर्णयाच्या पुढे एक पाऊल टाकले आहे.

दुसरीकडे असे दरपत्रक निश्‍चित करताना माथेरान मध्ये वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता दरपत्रकाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यात माथेरान मध्ये बॅनर लावण्यास वन विभागाची कोणत्याही स्वरूपतातील परवानगी दिलेली नाही आणि असे असताना ते बॅनर वन विभाग संबंधित यांच्यावर कारवाई करून काढत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Exit mobile version