सिलेंडरच्या स्फोटात बापलेकाचा मृत्यू

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या स्फोटात वसंत गणेश फटनाईक (70) व गणेश वसंत फटनाईक (29) या बाप लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एकाकी स्फोटाचा मोठा आवाज आल्याने घराच्या पुढील बाजूस असलेल्या याच घरातील कुटुंबातील व्यक्तींनी तसेच शेजार्‍यांनी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. कुडाळ एम आय डी सी अग्निशमन बंब दाखल झाले व आग विझवण्यात यश आले मात्र आग एवढी भयंकर होती की सर्व जाळून खाक झाले होते.
वसंत फटनाईक यांची बायको मनिषा वसंत फटनाईक या मासे विक्रीसाठी गेल्याने तिचे प्राण वाचले आहेत. दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू होता. दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, तहसीलदार प्रवीण लोकरे, सरपंच सुमन कामत, उपसरपंच हर्षद साळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, वेंगुर्ला गॅस एजन्सी चे नंदन वेंगुर्लेकर व कर्मचारी, ग्रामसेवक संदीप गवस, शिवसेनेचे नितीन मांजरेकर, तलाठी यांच्यासाहित सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.

Exit mobile version