बार असोसिएशन अध्यक्षपदी अ‍ॅड.प्रसाद पाटील; उपाध्यक्षपदी अ‍ॅड.अनंत पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांचा पराभव करत अ‍ॅड. प्रसाद पाटील विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी अनंत पाटील निवडून आले. त्यांनी अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांचा पराभव केला. सात वर्षांनी पार पडलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मंगळवारी (दि.14) सकाळी 8 वाजता मतदान सुरु झाल्यापासून लागलेली उत्कंठा रात्री पावणेदोन वाजेपर्यंत ताणली गेली होती.
 
सायंकाळी पाच वाजता मतपेट्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर तासाभराने मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 464 वकील सदस्यांपैकी 437 जणांनी आपला हक्क बजावला. अठरा फेर्‍यांमध्ये मतमोजणी पार पडली. सुरुवातीला दोन महिला आणि तीन सदस्य पदांसाठीची मोजणी झाली. 2 महिला सदस्यांच्या जागांसाठी 3 उमेदवार रिंगणात होत्या. यामध्ये अ‍ॅड. प्रविण ठाकूर पॅनलच्या अ‍ॅड. मंजिरी सावंत (284) आणि अ‍ॅड. पूजा भगत (228) निवडून आल्या. तर अपक्ष अ‍ॅड. रोशनी ठाकूर (222) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष सदस्यपदाच्या तीन जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. 
 
यात अ‍ॅड. प्रसाद पाटील यांच्या पॅनलचे अ‍ॅड.अझहर घट्टे (204 मते) आणि अ‍ॅड.पंकज पाटील (160 मते) निवडून आले. तर एका जागेवर अ‍ॅड.प्रविण ठाकूर पॅनलचे अ‍ॅड.कौस्तुभ पूनकर (174 मते) यांचा विजय झाला. अ‍ॅड.प्रसाद पाटील पॅनलचे अ‍ॅड.चंद्रभान सिंग (138), ठाकूर पॅनलचे अ‍ॅड.विकास पाटील (118), अ‍ॅड.संतोष राऊत (73), अपक्ष अ‍ॅड.अजय उपाध्ये (81), अ‍ॅड.राकेश पाटील (81), अ‍ॅड.जितेंद्र भगत (32), अ‍ॅड.सचिन मकानी (56), अ‍ॅड.रुपेश कृष्णा पाटील (75) हे पराभूत झाले.
 
अध्यक्षपदी अ‍ॅड.प्रसाद पाटील व अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांच्यात थेट लढत होती. अटीतटीच्या या लढतीत अ‍ॅड.प्रसाद पाटील 38 मतांनी निवडून आले. त्यांना 236 मते मिळाली. तर अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांना 198 मते मिळाली. उपाध्यक्षपदी अ‍ॅड.प्रसाद पाटील पॅनलचे अ‍ॅड.अनंत पाटील (259 मते), ठाकूर पॅनलच्या अ‍ॅड.मानसी म्हात्रे (155 मते) आणि अ‍ॅड.अरुण सावंत (21 मते) यांच्यात लढत होती. यात अ‍ॅड.अनंत पाटील यांनी 104 मतांनी विजय मिळवला.
 
खजिनदार पदासाठी अ‍ॅड.प्रसाद पाटील पॅनलचे अ‍ॅड.राजेंद्र माळी (275 मते) आणि ठाकूर पॅनलचे अ‍ॅड.राजीव शेरमकर (175) यांच्यात टक्कर होती. यात अ‍ॅड.माळी यांनी शेरमकर यांचा पराभव करत विजय मिळवला. सह-सचिव पदासाठी अ‍ॅड.प्रसाद पाटील पॅनलचे अ‍ॅड.निकेत चवरकर (236), ठाकूर पॅनलच्या अ‍ॅड.अर्चना राणे (168) आणि अपक्ष अ‍ॅड.प्रविण म्हात्रे (27) यांच्यात लढत झाली. यात अ‍ॅड.चवरकर यांनी बाजी मारत दणदणीत विजय मिळवला.
 
दरम्यान, सचिवपदी अ‍ॅड.अमित देशमुख आणि अंतर्गत हिशोब तपासणीसपदी अ‍ॅड.समाधान पाटील हे निवडणुकीआधीच बिनविरोध निवडून आले होते.

Exit mobile version