बासमती महागला

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
दिवाळीपासून घाऊक बाजारात तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यानुसार यंदाही मुंबई घाऊक बाजारात तांदूळ यायला सुरुवात झाली आहे. मात्र, बासमत सध्या परदेशात होत असलेल्या निर्यातीच्या तुलनेत कमी झालेल्या उत्पादनामुळे घाऊक बाजारात किलोमागे 10 ते 15, तर किरकोळ बाजारात 20 ते 25 रुपयांनी महागला आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात तांदळाची आवक सुरू झाली आहे. मे महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात ही आवक होत राहणार आहे. सध्या घाऊक बाजारात पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; तर महाराष्ट्रातील गोंदिया, चंद्रपूरमधूनही तांदूळ येतो. घाऊक बाजारात तांदळाची मासिक आवक सरासरी तीन ते चार लाख क्विंटल इतकी आहे. यामध्ये बासमती तांदळाची आवक सरासरी पंचावन्न ते साठ हजार क्विंटल इतकी असते. मागच्या दोन वर्षांत लॉकडाऊनमुळे बासमती तांदळाची मागणी नसल्याने दर पन्नास टक्क्यांनी घसरले होते.

त्यामुळे त्यावेळी बासमती तांदळाचा भाव घाऊक बाजारात 60 ते 70-75 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला होता. मात्र, त्यानंतर हळूहळू हा भाव वाढत 100 रुपये किलोपर्यंत आला होता. आता तो 120 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढला आहे. शिवाय परदेशातही बासमती तांदळाची निर्यात सुरू झाली आहे. त्यातच उत्पादन काही प्रमाणात कमी असल्याने हे दर वाढल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

लग्नसराईमुळे अधिक मागणी
बासमती तांदळाला दररोजच्या जेवणासाठी मागणी कमीच असते. पण या तांदळाचा सुगंध आणि चवीमुळे सण-समारंभ, उत्सव, कार्यक्रमांमध्ये या तांदळाला अधिक मागणी असते. अशातच सध्या लग्नसराईही सुरू आहे. त्यामुळे केटरिंग, हॉटेल चालकांकडून बासमतीला मागणी आहे. शहरात सण-समारंभ, लग्न आणि इतर कार्यक्रमही आता उत्साहाने होत आहेत.

Exit mobile version