आमदारांच्या गावातच बत्ती गुल

xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण

| खास प्रतिनिधी | रायगड |

लाईट, वीज, पाणी, रस्ते या सामान्य माणसांच्या साधारण गरजा आहेत. त्यांची पूर्तता करणे हे सरकार म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची प्रथम जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यांपासून थळ परिसरामध्ये 8-10 तास वीज खंडित होत आहे. तरीदेखील वीजबिल मात्र दुपटीने येते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड सताप आहे. विशेष बाब म्हणजे, याच थळ विभागात स्थानिक आमदार हे वास्तव्यास आहेत. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास त्यांना दिसत नाही का, असा प्रश्‍न आहे.
थळ ग्रामपंचायत ही अलिबाग शहराला लागून असणारी श्रीमंत ग्रामपंचायत अशी तिची ओळख आहे. या परिसरामध्ये थळ आगार, थळ बाजार, तसेच कोळीवाडा अशा परिसरामध्ये नागरीकरण विखुरलेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून थळ परिसरामध्ये विविध ठिकाणी सातत्याने वीज गायब होत आहे. त्याचा फटका येथील सर्वच नागरिकांना बसत आहे. दिवसातून किमान 8 ते 10 तास वीज जात असल्याने नागरिकांची चांगलीच अडचण होत आहे. विशेषतः सायंकाळनंतर वीज गेल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण निर्माण होत आहे. वीज खंडित होत असल्याची कारणे ग्राहकांना कळणे गरजेचे आहे.

विजेचा वापर कमी होत असतानादेखील वीजबिल वसूल करुन चालवलेली लूट थांबवण्यात यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. काही दिवसांवर आता गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीतदेखील विजेचा पुरवठा सातत्याने खंडित राहिल्यास नागरिकांमधील असंतोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

दरम्यान, याच प्रश्‍नी थळ बाजार कोळी समाजाने एमएसईबीचे अभियंता यांना शुक्रवारी निवेदन दिले. याप्रसंगी 60 ते 70 नागरिक उपस्थित होते. त्यांनीदेखील वीजपुरवठा सुरळीत सुरु राहावा, अशी मागणी केली. तसेच वीजपुरवठा खंडित होत असताना विजेचे बिल मात्र दुप्पट येत असल्याचेदेखील त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देण्यासाठी नागरिक अचानक आले होते. त्यांची येण्याची कोणतीच पूर्वसूचना कार्यालयाला नव्हती. तसेच वरिष्ठ अधिकारी हे बैठकीनिमित्त पेण येथे गेल्याचे एमएसईबीच्या पंतनगर येथील कार्यालयाकडून त्यांना सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकारी नसले तरी संबंधित कार्यालयाच्या अधिकार्‍याने निवेदन स्वीकारले.

Exit mobile version