उकाड्याने नागरिक हैराण
। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील 34 गावातील बत्ती गुल झाल्यामुळे रविवारच्या रात्री येथील नागरिकांना उकाड्याच्या आणि मच्छरच्या त्रासाला सामोरे जावे लागले. रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे येथील नागरिकांची उकाड्यामुळे झोपच उडाली. त्यात मच्छरचा व अंधाराचा देखील त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे येथील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. भेंडखळ सोनारी येथे विद्युत केबल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे.
अव्वाच्या सव्वा येणार्या वीज बिलांमुळे येथील नागरिक आधीच हैराण झाले आहेत. त्यात हा विजेचा तासंनतास लपंडाव सुरूच आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, आजारी माणसे तर रात्री अक्षरशः हैराण झाली होती. रात्री अकरा वाजता खंडित झालेली वीज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आली असल्याचे नागरिकांकडून समजते. त्यामुळे नागरिकांना अख्खी रात्र जागून काढावी लागली. घरातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे उकाड्याने आणि मच्छरने त्रासून गेलेली माणसे रात्री झोप लागत नसल्यामुळे, घरासमोरील अंगणात येऊन त्यांनी बसण्याचे पसंत केले. वारंवार आणि तासंनतास खंडित होणारा वीज पुरवठा हल्ली एकही दिवस सलग सुरू असलेला वीज पुरवठा येथील नागरिकांनी पाहिला नाही. दिवसा व रात्रीचाही कितीतरी तास वीज पुरवठा नसतोच. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी सर्वच उपकरणे बंद पडून सर्व कामे वीजपुरवठा अभावी ठप्प होत असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, मागील चार महिन्यांपासून भेंडखळ येथील खाडीजवळील विद्युत पोलांचे प्रलंबीत काम, गावोगावी पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहक तारांना अडचण ठरणार्या झाडांच्या फांदया छाटने, ट्रान्सफार्म्यांवरील अतिरिक्त लोड कमी दुसरीकडे जोडणे यासह विविध विजेबाबत नागरिकांना भेडसावणार्या समस्या मार्गी लावण्यासाठी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
सोनारी, करळ येथील एसइझेड प्रकल्पाच्या कामामुळे केबल तुटल्याची घटना घडली. तसेच, भेंडखळ येथे ही केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने रविवारी रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली होती. मात्र, महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी अंधारात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहे. तरी रहिवाशांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे.
विजय सोनावणे,
उपअभियंता महावितरण कंपनी, उरण