। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आठ महिन्यांपूर्वी टीम इंडियाला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा निराश झालेल्या भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेट घेतली होती. तसेच दु:खात असलेल्या भारतीय संघाचं सांत्वन केलं होतं. आता चित्र बदललं आहे.
भारतीय संघाने बारबाडोसमध्ये जाऊन भारताचा झेंडा रोवला आहे. टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरून मायदेशी परतली. टीम इंडियाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं असताना भारतीय संघाने दिल्लीत उतरल्या उतरल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण संघासोबत जवळपास दीड तास चर्चा रंगली. या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला असून ट्रेंड होत आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाची जर्सी गिफ्ट देण्यात आली. त्यावर शॉर्टफॉर्म म्हणून नमो लिहिलं आहे. तसेच जर्सीचा क्रमांक 1 दिला आहे. विजयी भारतीय क्रिकेट संघाने आज आगमनानंतर भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सर, तुमच्या प्रेरणादायी शब्दांबद्दल आणि संघाला तुम्ही दिलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, असं ट्वीट बीसीसीआयने केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत भेटीची माहिती दिली आहे. ‘चॅम्पियन्ससोबत छान भेट झाली. 7, लोककल्याण मार्ग येथे विश्वचषक विजेत्या संघाचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान संस्मरणीय गोष्टी घडल्या.’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वानखेडेवर फ्री एन्ट्री असल्याने मैदान खचाखच भरणार यात शंका नाही. वानखेडे स्टेडियमवर विजेत्या संघाचा सत्कार असणार आहे. यावेळी बीसीसीआय विजेत्या संघाला 125 कोटींची रक्कम देणार आहे.