प्रा. अशोक ढगे
गुळाला मुंगळे चिकटतात हा प्रकृतीपासून वृत्तीपर्यंत दिसणारा सामायिक गुणधर्म आहे. त्यामुळेच क्रिकेट या सभ्य गृहस्थांच्या खेळात अनेक असभ्य प्रथांनी शिरकाव केला. असं असताना मिळेल ती संधी साधण्याचा मक्ता घेणारे राजकारणी यापासून दूर कसे राहू शकतील? त्यामुळे काळानुरुप क्रिकेट आणि राजकारणाच्या साट्यालोट्याची वीण अधिकाधिक घट्ट झाली. ‘बीसीसीआय’ आणि ‘एमसीए’शी संबंधित ताज्या घटनांमधून हेच दिसतं.
क्रिकेटला पूर्वी असणारी ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ ही ओळख अजूनही मानानं मिरवणं शक्य आहे का, हा प्रश्न प्रत्येक सजग आणि सुजाण माणसाला पडू शकतो. कारण अगदी स्पष्ट आहे. पूर्वी अन्य खेळांप्रमाणे हादेखील एक सामान्य खेळ होता. काळानुरुप इंग्रजांनी रुजवलेल्या आणि स्वकियांनी आत्मसात केलेल्या या खेळाला देशात सर्वाधिक प्रसिद्धी मिळू लागली आणि अत्यंत स्वाभाविकपणे त्याचं सहउत्पादन असणारा पैसा, प्रसिद्धी, समाजातलं उच्च स्थान आणि स्वत:चा खेळ संपल्यानंतरही क्रिकेट शिकू इच्छिणार्या असंख्यांना शिकवून होणारं कोट्यवधीचं अर्थार्जन या गोष्टीकडे आकृष्ट होणार्यांची संख्या वाढू लागली. गुळाला मुंगळे चिकटतात हा तर प्रकृतीपासून वृत्तीपर्यंत दिसणारा सामायिक गुणधर्म. त्यामुळेच या सभ्य गृहस्थांच्या खेळात अनेक असभ्य प्रथांनी शिरकाव केला. असं असताना मिळेल ती संधी साधण्याचा मक्ता असणारे राजकारणी यापासून दूर कसे राहू शकतील? त्यामुळे क्रिकेट आणि राजकारणाच्या साट्यालोट्याची वीण काळानुरुप अधिकाधिक घट्ट झाली आणि अनेक प्रकारच्या फिक्सिंगने क्रिकेटचं मैदान तुडवलं जात राहीलं. यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूकही याच रिवाजानुसार पार पडली. क्रिकेट चालवण्याच्या बाबतीत भारतातले राजकारणी ‘खेळाच्या फायद्यासाठी’ एकत्र येण्याची प्रथा यंदाही पार पडली. क्रिकेटच्या खेळपट्टीवर आलेला प्रमुख राजकीय पक्षांचा ‘संगम’ हे त्याचं ताजं उदाहरण आहे. इथे ‘मैत्री’ नसूनही त्यांच्यातला सामना मैत्रीपूर्ण होता.
आधी ‘एमसीए’च्या अध्यक्षपदासाठी भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील यांना पाठिंबा देणार्या शरद पवार यांनी शेवटच्या क्षणी आखलेल्या तडजोडीचं सूत्र प्रतिबिंबित करणार्या एका आश्चर्यकारक घडामोडीमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी अचानक मुंबई भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मुंबई भाजपाचे प्रमुख आणि माजी एमसीए अध्यक्ष आशिष शेलार या पदासाठी इच्छुक असल्यामुळे पवारांच्या यू-टर्नमुळे ‘पवार-शेलार गट’ निर्माण झाला. पण शेलार यांनी बीसीसीआयमध्ये खजिनदारपद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे या गटाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी अमोल काळे यांना पाठीशी घातलं. अमोल काळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मतदारांसोबत (शाळा, महाविद्यालयं आणि कार्यालयीन क्लबमधल्या) गटाच्या बैठकीत एमसीएला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं. पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे पवार-शेलार गटाचे सर्वोच्च परिषद सदस्यपदासाठीचे दोन महत्त्वाचे उमेदवार म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर हे शिंदे आणि फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. श्री. आव्हाड महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते तर नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे पीए आणि एमसीएच्या टी 20 गव्हर्निंग कौन्सिलचे माजी अध्यक्ष आहेत. या गटातले आणखी एक उमेदवार विहंग सरनाईक हे मुख्यमंत्री शिंदे यांचे सहकारी आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत. मुंबई टी 20 लीग गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी विहंग यांची बिनविरोध निवड झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याच्या भाजपच्या निर्णयाचा संबंध थेट एमसीए निवडणुकीशी असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ‘एमसीए निवडणुकीसाठी सेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समान उमेदवारासाठी हातमिळवणी केली आहे. मी अनेक दशकांपासून राजकारणात आहे, परंतु मला परिस्थिती समजू शकली नाही,’ असं पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले की घडामोडी अचानक अथवा योगायोगाने घडलेल्या नाहीत. सर्वप्रथम मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर एका तासापेक्षा कमी कालावधीत राज यांनी फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मागे घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली आणि पवारांनीही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा आग्रह धरला. असं असलं तरी श्री. काळे यांनी हा गट बिगरराजकीय असल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘ही संधी दिल्याबद्दल मी पवारसाहेब आणि आशिषजींचा आभारी आहे. पवारसाहेब आणि आशिषजींच्या नेतृत्वाखाली आमचा हा बिगर-राजकीय गट आहे आणि त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यात जितेंद्र आव्हाड, नार्वेकर यांसारख्या लोकांचा समावेश आहे आणि मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही सर्वजण राजकीय मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. ही एक तरुण टीम आहे, सर्वांनी आपापल्या आयुष्यात काही तरी साध्य केलं आहे. त्यामुळे आम्ही एमसीएला वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी या अनुभवाचा नक्कीच उपयोग करून घेऊ. आम्ही आमच्या कौशल्याचा वापर करून एमसीएचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे सर्व प्रश्न सोडवू. मी एमसीएसाठी प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये आणि क्लबसाठी नवीन क्रिकेट क्रियाकलाप विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेन,’ असंही ते पुढे म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याच्या चर्चेवर काळे म्हणाले, ‘मी प्रत्येकाच्या जवळ आहे आणि अनेक लोकांशी माझी मैत्री आहे. त्याचप्रमाणे देवेंद्रजींच्या शहराचा (नागपूर) असल्याने अर्थातच मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मतांसाठी आवाहन करणार्या त्यांच्या गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबद्दल बोलताना पवार आणि शेलार यांनी एक गट तयार केल्याबद्दल कौतुक वाटतं असंही त्यांनी सांगितलं.’
या सगळ्याबरोबरच रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून झालेली नियुक्ती ही क्रिकेटविश्वातली महत्त्वपूर्ण घटना म्हणावी लागेल. जय शहा पुन्हा सचिवपदाची जबाबदारी स्वीकारतील. नामांकनाच्या वेळी विरोधात कोणीही नसल्याने रॉजर बिन्नी यांचं नाव निश्चित असल्यातच जमा होतं. 18 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आता बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी राजीव शुक्ला यांच्याकडे असेल तर जय शहा सचिवपद राखतील. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्वागत करुन रॉजर बिन्नी यांना शुभेच्छा दिल्या. ‘बीसीसीआय चांगल्या हातात आहे. भारतीय क्रिकेट मजबूत आहे. त्यामुळे मी त्याला शुभेच्छा देतो’ या शब्दात त्यांनी बिन्नी यांचं स्वागत केलं. रॉजर हे भारतातले पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहेत. 1983 चा विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघातले तेे महत्त्वाचे सदस्य होते. त्या विश्वचषकात त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं. 1983 मध्ये कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली असल्यामुळे ती स्पर्धा आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. रॉजर बिन्नी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. आता त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनी भारतीय संघाचा निवडकर्ता म्हणूनही काम केलं आहे. संदीप पाटील निवड समितीचे अध्यक्ष असताना ते त्या समितीचे सदस्य होते.
असं म्हटलं जातं की, त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीच्या भारतीय संघातल्या निवडीबद्दल चर्चा झाली तेव्हा त्यांनी या वादात भाग घेतला नाही आणि निर्णय बाकीच्या सहकार्यांवर सोपवला. टीम इंडियाने बिन्नीच्या नेतृत्वाखाली आणखी एक विश्वचषक जिंकला आहे. रॉजर बिन्नी 2000 मध्ये भारतीय अंडर-19 संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या देखरेखीखाली टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषक जिंकला. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली आणि रॉजर बिन्नी यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकला. त्या संघात युवराज सिंग आणि वेणुगोपाल रावसारखे क्रिकेटपटूही खेळले होते. या आधी रॉजर बिन्नी बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांची नवी खेळी भारतीय क्रिकेटसाठी कितपत उपयुक्त ठरते, ते आता पहायचं. राजकारण्यांच्या आश्चर्यकारक खेळीमुळे मात्र सामान्यजनांची बोटं आश्चर्याने तोंडात गेली.