‘ या’ विश्‍वचषकासाठी ‘बीसीसीआय’ची दावेदारी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येक दोन वर्षांनी जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेची तयारी दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2024 पासून सुरू होणार्‍या आठ वर्षांच्या कार्यक्रमपत्रिकेत भारताने दोन विश्‍वचषकासह तीन जागतिक स्पर्धासाठी दावेदारी केली आहे.

‘बीसीसीआय’च्या ऑनलाइन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘बीसीसीआय’ने 2025 ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, 2028 ची ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा आणि 2031 मध्ये होणार्‍या एकदिवसीय प्रकाराच्या विश्‍वचषकासाठी दावेदारी केली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने दिली.
2017 नंतर न झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, असे नुकतेच ‘आयसीसी’ने स्पष्ट केले होते. त्यानुसार आगामी कार्यक्रमपत्रिकेत त्याचा समावेश करण्यात येणार आहे. 2023च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्‍वचषकानंतर भारताने आगामी योजना यावेळी स्पष्ट केल्या. पुढील कार्यक्रमपत्रिकेत एकदिवसीय विश्‍वचषकात 14 आणि ट्वेन्टी-20 विश्‍वचषकात 16 संघ असतील, असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.

रणजी नुकसानभरपाईसाठी समितीची स्थापना
मागील हंगामात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला होता. परंतु त्याच्या वाटपाचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी ‘बीसीसीआय’ने 10 सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. या समितीत चारही विभागांचे एकेक प्रतिनिधी, चार कार्यकारिणी सदस्य, अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा समावेश असेल.

Exit mobile version