‌‘भात कापणी करताना काळजी घ्या’

| तळा | प्रतिनिधी |

सध्या सर्वत्र भातशेती पिकून तयार झाली असल्याने भात कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, भात कापणीच्या हंगामात विंचू दंशाच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लांबलेल्या पावसामुळे भात कापणीला उशिरा सुरुवात झाली असून, कधीही पाऊस कोसळत असल्यामुळे घाईघाईनेच भात कापणी केली जात आहे. परंतु, भात कापणी करताना अनेकदा बेसावध असल्यामुळे विंचू दंशाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे भात कापणी करताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामध्ये शेतात काम करताना पायात गमबूट वापरणे, हातात रबरी हॅन्डग्लोज घालणे,डोक्यात टोपी घालणे यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागात बहुतांश वेळा विंचू दंश झाला तर त्याला सुरुवातीला मंत्रिकाकडे विष उतरविण्यासाठी नेण्यात येते मात्र यामुळे उशीर होऊन वेळप्रसंगी त्या रुग्णाच्या शरीरात विष पसरला जाऊन जीवितास धोका निर्माण होतो.त्यामुळे विंचू दंश झाल्यास रुग्णाला उपचारासाठी त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे जेणेकरून वेळेवर उपचार झाल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचतील. असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version