गंभीर व्हा!

बांगलादेशविरुद्ध सामना जिंकून भारतीय संघ गुरुवारी मेलर्बनला दाखल झाला. गुरुवारी ‘ट्रॅव्हल डे’ म्हणून आराम होता. शुक्रवारीही विश्रांतीचा दिवस होता. भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना अद्यापि सूर गवसलेला नाही. अशा वेळी कुटुंबियांसोबत शहराचा फेरफटका मारणे कितपत योग्य आहे? काहींनी तर हॅलिकॉप्टर राईड केली. एक-दोन खेळाडूंच्या बळावर येथवर मजल मारलेल्या संघाकडून ही अपेक्षा नाही.

खरं तर, भारताला मेलबर्नमध्ये आज अधिक सराव करुन, चिंतन-मनन करुन पुढील सामन्यांसाठी अधिक परिपूर्ण, सुसज्ज होण्याची गरज होती. अंतिम सामनाही याच मेलबर्न स्टेडियमवर होणार आहे. कदाचित अंतिम सामन्याआधी याच मैदानाशी, तेथील वातावरणाशी अधिक एकरुप होण्याची नामी संधी होती. ती भारताने आज तरी साधली नाही.

आतापर्यंतच्या चार सामन्यांत भारतीय संघ एक-दोन खेळाडूंच्या बळावरच जिंकत आला. पाकिस्तानविरुद्ध कोहलीची फलंदाजी, अर्षदीपची गोलंदाजी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमारची तडफदार खेळी. बांगलादेशविरुद्ध के.एल. व कोलहीची अर्धशतके आणि अर्षदीपचीच गोलंदाजी. अन्य खेळाडू या विजयामध्ये फारसे चमकलेले दिसत नाहीत. अशावेळी अपयशी ठरणार्‍या खेळाडूंनी आपापल्या चुका सुधारण्यासाठी तरी सरावाची संधी साधायला हवी होती. झालेल्या चुकांवरच्या उपाययोजनांचा विचार करायला हवा होता.

सर्वप्रथम, सध्या ऑस्ट्रेलियातील पावसाळी हवामानाचा विचार व्हायला हवा. सामन्यामध्ये कधीही थांबू शकतो. ‘डकवर्थ-लुईस मेथड’ तुम्हाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये चेंडूमागे एक धाव नाही तर सहा षटकांत 70-80 धावांचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून फलंदाजी करायला हवी.

भारताचा कर्णधार फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे तो अडखळत खेळतोय. के.एल.ची बॅट चौथ्या सामन्यात चमकली. कोहली आणि सूर्यकुमारवर आपण किती अवलंबून राहणार? अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात घेतलेल्या हार्दिक पंड्याने फलंदाजीतही संघाला हातभार लावायला हवा. पाकिस्तानविरुद्ध एका उत्तम खेळीनंतर तोही लोंबकळतोय.

अर्षदीप पहिल्या स्पेलमध्ये जोशात गोलंदाजी करतो. पण, दुसर्‍या स्पेलमध्ये त्याची जरब कमी झालेली दिसते. खरं तर, गोलंदाजीच्या प्रशिक्षकांनी गोलंदाजांना समज देणे गरजेचे आहे. अ‍ॅडलेड क्रिकेट ग्राऊंडच्या स्न्वेअरच्या दोन्ही बाजूची सीमारेषा छोटी आहे. चेंडू आपटला, आखूड टप्प्यावर पडला तर षटकारच जाणार, हे ठाऊक असूनही हार्दिक पंड्या व अर्षदीप सिंग आखूड टप्प्याचे चेंडू टाकत होते. बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनीदेखील त्यामुळे षटकार मारले. अशा वेळी यॉर्कर किंवा पूर्ण टप्प्यावर टाकलेले चेंडूच प्रभावी ठरत असतात. बाऊन्सरवर मर्यादा आहे; पण यॉर्कवर नाही. भारतीय खेळाडूंना यॉर्करचा आज सराव करण्याची संधी होती. वसिम अक्रम किंवा लसीत मलिंगा, मॅक्ग्रा हे गोलंदाज याच अस्त्रामुळे अधिक धोकादायक वाटायचे. शमी व पंड्या यॉर्करवर भर का देत नाहीत, हेही कोडे आहे. आणि सरतेशेवटी, आपण विश्‍वचषक स्पर्धेत खेळतोय याचे भारतीय संघाला भान हवे. अन्य स्पर्धा किंवा मालिकांमधील पराभव लवकर विसरले जातात. कुणी ते अपयश फारसे लक्षात ठेवत नाहीत. पण, विश्‍वचषकातील पराभव जिव्हारी लागतात. विश्‍वचषकातील पराभवाचे शल्य पचविणे अवघड असते. अशा विश्‍वचषक स्पर्धेला जगभरातून भारतीय क्रिकेटरसिक प्रचंड पैसा खर्च करुन येत असतात. देशाची इभ्रत, वाढलेली शान त्यांना पहायची असते. संघाचा ‘कॅज्युअल अ‍ॅप्रोच’ त्या सर्वांच्या भावनांशी खेळत असतो. किमान यावेळी तरी ऑस्ट्रेलियात असे होऊ नये.

Exit mobile version