पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरूच; प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा पर्दाफाश
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील समुद्रकिनारे हे आता पर्यटनस्थळ कमी आणि ‘मृत्यूचा सापळा’ अधिक बनत चालल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सोमवारी (दि.13) सायंकाळी घडलेल्या घटनेत पाच पर्यटक समुद्राच्या भरतीत अडकून मृत्यूच्या दारात पोहोचले होते; मात्र, सागर सुरक्षा रक्षकांच्या प्रसांगवधानाने त्यांचे प्राण बचावले. या थरारक घटनेमुळे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यासह नागाव किनाऱ्यावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. परंतु, या ठिकाणी सुरक्षेच्या नावाने मात्र शून्य व्यवस्था असल्याचे संतापजनक चित्र आहे. तसेच, धोकादायक भागांची कोणतीही सूचना नाही, इशारे देणारे फलक नाहीत, टेहाळणी चौक्या नाहीत. त्यामुळे ‘जा आणि जीव धोक्यात घाला’, असा मोकळा परवाना प्रशासनाने दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पिरवाडी परिसरात पीर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्रात उतरत असतात. ओहोटीच्या वेळी पुढे गेलेले हेच पर्यटक भरती सुरू होताच चारही बाजूंनी पाण्यात अडकतात आणि आरडाओरडा करत जीव वाचवण्याची याचना करतात. अशा घटना वारंवार घडत असतानाही प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी भूमिका घेतली आहे.
सोमवारी घडलेल्या घटनेत पाच पर्यटक भरतीच्या पाण्यात अडकले होते. माहिती मिळताच सागर सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि अत्यंत धाडसाने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली; मात्र, प्रत्येक वेळी नशिब साथ देईलच याची खात्री कोण देणार? असा सवाल स्थानिकांसह पर्यटकांमधून विचारला जात आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, पिरवाडी ते नागाव समुद्रकिनाऱ्यावर एकही टेहाळणी चौकी नाही. सुरक्षा रक्षकांकडे आवश्यक साधनसामग्री नाही. तरीही ते स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवत आहेत. प्रशासन मात्र वातानुकुलीत कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असल्याची तीव्र टीका स्थानिकांकडून होत आहे. तसेच, दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत असतानाही ग्रामपंचायत, तहसील प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित विभागांनी एकत्र येऊन ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. हे निष्क्रियपणच उद्याच्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे ‘आता तरी जागे व्हा’, असा संतप्त इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच, येथील किनाऱ्यांवर तात्काळ धोक्याचे फलक उभारणे, टेहाळणी चौक्या सुरू करणे आणि सागरी सुरक्षा रक्षकांना अत्याधुनिक साधनसामग्री देणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा, एखाद्या मोठ्या जीवितहानीनंतरच प्रशासनाला शहाणपण सुचणार का? असा संतप्त सवाल देखील नागरिकांमधून विचारला जात आहे.
घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग
पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर वारंवार घडणाऱ्या जीवघेण्या घटनांनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असल्याचे चित्र समोर आले आहे. वर्षभरात अनेक वेळा पर्यटक आणि नागरिक भरतीच्या पाण्यात अडकून जीव धोक्यात घालण्याच्या घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत होती. मात्र, आता वाढत्या टीकेनंतर आणि सलग घटनांनंतर प्रशासनाने हालचाल करण्याचे संकेत दिले आहेत. उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी पिरवाडी किनाऱ्यावरील वाढत्या दुर्घटनांची दखल घेत, ग्रामपंचायतीमार्फत लवकरच योग्य ती खबरदारी घेत सुरक्षा फलक लावण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, हा निर्णय उशिराने घेतल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे. तसेच, आता तरी प्रशासनाने फक्त घोषणा न करता प्रत्यक्षात तातडीने फलक उभारून, टेहाळणी व्यवस्था वाढवून आणि सुरक्षा उपाययोजना कडक कराव्यात. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.
पिरवाडी समुद्र किनारी वर्षभरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेऊन या ठिकाणी सुरक्षा फलक लावण्यात येतील.
सर्जेराव पाटील,
गटविकास अधिकारी, उरण पंचायत समिती.
