रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा
। पनवेल । वार्ताहर ।
राज्य महामार्ग क्रमांक 103 अर्थात पनवेल उरण जुना रस्ता हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. भीमकाय खड्डे आणि धुळीचे साम्राज्य यातून प्रवास करताना नागरिक जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करत असतात. कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्या या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम नक्की कोणाच्या अखत्यारीत येते? याचा शोध घेतला असता सिडकोचा निष्क्रियपणा चव्हाट्यावर येतो. जून 2016 पर्यंत या रस्त्याच्या देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. त्यानंतर वडघर खाडी पूल ते गव्हाण फाटा अशा नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या देखभालीचे काम सिडकोकडे वर्ग करण्यात आले. सिडकोने या महत्त्वपूर्ण रस्त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याला गव्हाण फाट्याच्या अगोदर राष्ट्रीय महामार्गासाठी एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट दिलेला आहे. या ठिकाणी तर दोन ते अडीच फूट खोल खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणार्यांना मणक्याचे आजार, पाठ दुखी, मानेच्या व्याधी जडल्या आहेत. कित्येक निष्पाप जीव अपघातात मारले गेले आहेत. येथे छोटे मोठे अपघात तर रोजच घडत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असेपर्यंत या रस्त्याच्या देखभालीचे काम योग्य पद्धतीने होत होते.परंतु सिडकोच्या अखत्यारीत गेल्यानंतर या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत नागरिकांना रस्ता कापावा लागत आहे.