अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
| उरण | वार्ताहर |
उरण-करंजा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे जिकिरीचे बनले आहे. या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा अधिक वजनाची अवजड वाहने ये-जा करीत आहेत. याबाबत अधिकारी वर्गाकडे वारंवार तक्रारी करूनही ते ठेकेदाराशी असलेल्या आर्थिक साटेलोटामुळे याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका 20 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. सदरचा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. उरण-करंजा रस्त्याच्या दुरावस्थेला प्रामुख्याने शासकीय अधिकारी वर्गच जबाबदार आहेत. त्यांनी याकडे वेळीच लक्ष दिले असते तर तरुणीचा बळी गेला नसता. याकडे लक्ष दिले नाहीतर अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला सर्वस्वी जबाबदार शासकीय अधिकारी वर्गाला धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उरण-करंजा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.