| पाली/गोमाशी | वार्ताहर |
आपल्याला माणसांसाठी असणारे रेस्टॉरंट माहिती आहे. मात्र, गिधाडांसाठी रेस्टॉरंट कधी ऐकले आहे का? हो! रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यात चक्क गिधाडांसाठी एक रेस्टॉरंट आहे.
ग्रीन वर्कस् ट्रस्ट ही बिगर शासकीय संस्था मागील काही वर्षे फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन व जनजागृती या विषयांवर कार्यरत आहे. फणसाड अभयारण्यात वनखात्याच्या माध्यमातुन व्हल्चर रेस्टॉरंट (गिधाड आहार केंद्र) हे गिधाडांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण उभारले आहे. साल 2014 मध्ये याठिकाणी 20-25 गिधाडे पाहण्यात आली होती. मात्र, त्यांनतर या ठिकाणी गिधाडे पाहण्यात आली नाहीत. त्यामुळे या गिधाड रेस्टॉरंटचा मुख्य उद्देश, गिधाडांना या ठिकाणी आकृष्ट करणे हा आहे. यामुळे फणसाड अभयारण्यात गिधाडांचे पुनरुज्जीवन व संवर्धन होऊन त्यांच्यावर संशोधन देखील होईल.
सदर गिधाड रेस्टॉरंटचे कामकाज आणि त्याबाबत जनजागृती करण्याचे काम हे ग्रीन वर्कस् ट्रस्ट आणि एस.बी.आय. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाले आहे. या कार्यास महाराष्ट्र वनविभाग (ठाणे, वन्यजीव) यांचे मोलाचे सहकार्य व सहाय्य त्यांना लाभत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गिधाड हा पक्षी ‘अनुसूची एक’मध्ये समाविष्ट आहे. तरीही, सद्यःस्थितीत गिधाडांची संख्या अतिशय कमी झालेली दिसते. तरी, त्यांच्या संवर्धनासाठी त्यांना नियमित अन्नपुरवठा मिळावा या हेतूने गिधाड आहार केंद्रात जनावरांचे मृतदेह पुरवण्याचे काम या प्रकल्पात हाती घेतले आहे.
पशुसंवर्धन विभागाचे सहकार्य
सदर प्रकल्पास रायगड पशुसंवर्धन विभाग सहकार्य करत आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना वा पशुचिकित्सालय यांच्या मार्फत जिल्ह्यातील मृत जनावरांची माहिती तात्काळ सदर संस्थेस देण्यात येत आहे.
मृत जनावरांची मोफत वाहतूक
आपल्या आजूबाजूला एखाद्या जनावराचा (गाय, बैल, म्हैस, घोडा, गाढव) मृत्यू झाल्यास कृपया ग्रीन वर्कस् ट्रस्टला 9096297059 व 8779409460 या क्रमांकांवर संपर्क साधावा. जनवारांस विषबाधा किंवा जनावरचा मृत्यू प्लॅस्टिक खाऊन झालेला नाही याची मात्र दक्षता घेणे आवश्यक आहे. सदर मृत जनावरांची वाहतूक संपूर्णपणे मोफत आहे. आपल्या परिसरातील या स्वच्छतेच्या कामाला तसेच पर्यावरण संवर्धनाच्या कामाला वेळोवेळी आपल्याकडून सहकार्य लाभावे असे आवाहन ग्रीन वर्कस् ट्रस्टचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. निखिल भोपळे यांनी केले आहे.
या प्रकल्पाचा इतिहास
डिसेंबर 2021 मध्ये या प्रकल्पाचा पथदर्शी प्रकल्प सुरु झाला. टीमद्वारे जनावरांचे मृतदेह गिधाड आहार केंद्रात पुरवले गेले आणि 11 महिन्यांनंतर आशेचा किरण दिसला. 2022 च्या नोव्हेंबर महिन्यात गिधाड संवर्धन केंद्रात इजिप्शियन गिधाड दिसले. परिणामी, नव्या जोमाने गिधाड संवर्धन प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेचे आयोजन रायगड पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य यांची पशुगणनेसंदर्भातील कार्यशाळा पनवेल येथे संपन्न झाली. यामध्ये ग्रीन वर्कस् ट्रस्टने उपस्थितांना प्रकल्पासंदर्भात माहिती दिली व त्यांना मदतीचे आवाहन केले. सदर कार्यक्रमास प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, सहाय्यक आयुक्त खालापूर डॉ. रत्नाकर काळे, सहाय्यक आयुक्त अलिबाग डॉ. अजय कांबळे, ग्रीन वर्कस् ट्रस्टचे डॉ. निखिल भोपळे आणि जिल्ह्यातील सर्व सहायक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.