| सारळ | वार्ताहर |
डाक विभागाच्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी डाक विभागाकडून विविध पातळीवर (डिव्हिजन, रिजन, राज्य) शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी जिल्हा अधीक्षक रायगड डाक विभाग यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर, रिजनमधील पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई यांनी दि. 27 सप्टेंबर रोजी 11 वाजता पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, दुसरा माळा, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत नवीन पनवेल येथे व राज्य पातळीवरील डाक अदालत मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेक्स बिल्डिंग, जीपीओ पाचवा माळा, मुंबई येथे 25 सप्टेंबर रोजी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या डाक अदालतीचा हेतू ग्राहकांच्या समस्या वेगवान व प्रभावी रीतीने विनाविलंब सोडवणे हा आहे. या डाक अदालतीमधून डाक विभागाच्या ग्राहकांच्या असणार्या समस्यांवर, तक्रारींवर जागेवरच निर्णय घेऊन तोडगा काढण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये स्पीड, रजिस्टर, पार्सल या तक्रारीचे सहा आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असलेले प्रलंबित तक्रारीचे निवारण केले जाणार आहे.
यात फक्त न्यायालयात असणारी, कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे या अदालतीमध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. दि 20 सप्टेंबरपर्यंत कागदपत्रसह आलेल्या तक्रारींचा या डाक अदालतमध्ये समावेश केला जाईल याची नोंद घ्यावी. संबंधित प्रकरणावर तक्रारदारांनी या आदलतीमध्ये कागदपत्रासह येऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी केले आहे.