पनवेल | वार्ताहर |
बेडरूमच्या भिंतीला तडे गेल्याचा राग मनात धरून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार कामोठे परिसरात घडला आहे. आरोपींविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडियन नेव्ही मधून रिटायर्ड झालेले सुभाषचंद्र भरत पात्र (वय 69 )हे कामोठे, सेक्टर 5 येथे राहतात. 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या घराच्या हॉलचे प्लास्टर करण्यासाठी मेस्त्री आणि सोबत काम करण्यासाठी इसम आले होते. पियूपी काढत असताना बाजूच्या रूमच्या बेडरुमच्या भिंतीचे प्लास्टरला तडे गेले. यावेळी राज किशोर शर्मा, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा व त्यांच्या घरात राहणारा एक मुलगा असे चौघेजण सुभाषचंद्र यांच्या घरी आले व बेडरूमच्या भिंतीला तडे गेले असे बोलून आरडाओरडा करू लागले. यावेळी तडे गेले असतील तर ते काम करून देतो असे सांगितले असता राजकिशोर यांच्या मुलाने सुभाषचंद्र यांचा गळा दाबला. व त्यांच्या पत्नी, राजकिशोर आणि एका मुलाने त्यांना धक्का दिला. त्यामुळे ते गॅलरीत पडले. चौघांनीही सुभाषचंद्र यांना शिवीगाळ करून हातापायांने मारहाण केली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता कमरेच्या मणक्याला फॅक्चर असल्याचे सांगितले आहे. चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.