पनवेल | वार्ताहर |
चिंचवली येथे सदनिका न देता दोन लाख 13 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यवसायिक यशवंत झेंडे यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वीनगर, ठाणे येथील रोहन विनोद शिंदे हे पनवेल परिसरात नवीन घर विकत घेण्यासाठी शोधत होते. यावेळी सुमेध इंटरप्राईजेसचे संकल्प बिल्डर अँड डेव्हलपर्सचे होर्डिंग त्यांना दिसले. त्या वरील नंबर वर फोन केला असता त्यांन चिंचवली येथील साईट विजिट साठी बोलावून घेण्यात आले. चिंचवली येथे गेल्यानंतर प्लॉटवर नियोजित प्रकल्प चालू करणार असल्याचे सांगितले. यावेळी 275 चौरस फुटाच्या सदनिकेसाठी 3 लाख 30 हजार रुपये सांगण्यात आले. त्यामुळे रोहन शिंदे यांनी दोन लाख 53 हजार पाचशे रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर सदनिकेच्या बांधकामा बाबत विचारणा केली असता काम चालू असल्याचे सांगण्यात आले. साइटवर जाऊन चौकशी केली असता काही रूमचे काम करून बिल्डरने त्या रूम भाडे तत्त्वावर दिले असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. बिल्डरच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता रोहन यांच्या वडिलांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे यशवंत झेंडे यांना फोन करून भरलेली रक्कम परत देण्यासाठी सांगितले. यावेळी यशवंत झेंडे यांनी 40 हजार रुपये परत दिले. आणि सदनिका न देता दोन लाख 13 हजार पाचशे रुपयांची फसवणूक करण्यात आली.