रिक्षावाल्याला मारहाण ; चार आरोपींना बेड्या

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पोटलज फाटा येथे रविवारी (ता.17) रात्री अकराच्या सुमारास एका रिक्षावाल्याला चार जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. पाली पोलिसांनी ताबडतोब या चारही जणांना मोठ्या शिताफीने पकडले आहे. यातील दोन जण हे अल्पवयीन असल्याने कर्जत बालसुधारगृहात आहेत. तर दोन जण अलिबाग कारागृहात आहेत.

याबाबत पाली पोलिस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षा चालक प्रमोद गुजर (वय 39) हे खोपोलीवरून आपली रिक्षा घेऊन एकटेच बहिरीचीवाडी येथे जात होते. यावेळी ते पाली नांदगाव रस्त्यावर पोटलज फाटा येथे आले असता चार अज्ञात इसमांनी त्यांची रिक्षा अडवली आणि पेट्रोलसाठी पैसे मागितले. यावेळी रिक्षा चालक यांनी पैसे देण्यास नकार दिला असता गुजर यांना रिक्षातून बाहेर रस्त्यावर खेचले आणि रस्त्याच्या बाजूला झाडाजवळ नेऊन खाली पाडले. तसेच सर्वांनी मिळून त्यांचे डोके रस्त्यावर आपटून दुखापत केली. व गुजर यांच्या खिशातील पैशाचे पाकीट काढून त्यातील तीन हजार रुपये व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पसार झाले. गुजर व त्यांचे भाऊ रात्री पाली पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आले. व घडला प्रकार सांगितला.

जखमी गुजर यांना उपचारासाठी पाली प्राथमिक केंद्रात पाठविण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे तपास पथक घटनास्थळी व पोटलज गावात आणि इतर ठिकाणी गेले. तिथे तपास करून दोघांना लगेच अटक करण्यात आली. आणि दुसर्‍या दिवशी दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पैसे व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे, हेड कॉन्स्टेबल महेश लांगी, पोलीस कॉन्स्टेबल विकास राठोड व चंदनशिवे, धर्मेंद्र म्हात्रे, शेडगे व घासे हे सहभागी होते.

Exit mobile version