। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील पोटलज फाटा येथे रविवारी (ता.17) रात्री अकराच्या सुमारास एका रिक्षावाल्याला चार जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. अखेर पाली पोलिसांनी त्या चारही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना कर्जत बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून अन्य दोघांची रवानगी अलिबाग कारागृहात करण्यात आली आहे.
याबाबत पाली पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षा चालक प्रमोद गुजर (वय 39) हे खोपोलीवरून बहिरीचीवाडी (भिरा,माणगाव) येथे जात होते. यावेळी पाली-नांदगाव रस्त्यावर पोटलज फाटा येथे आले असता चार अज्ञात इसमांनी त्यांची रिक्षा अडवली. तसेच पेट्रोलसाठी पैसे मागितले. यावेळी रिक्षा चालक प्रमोद गुजर यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी प्रमोद गुजर यांना मारहाण केली. तसेच पैसे व मोबाईल चोरुन पळ काढला. याप्रकरणी पाली पोलीस ठण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीनूसार पोलिसांनी तपास सुरु केला.
पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने तपास करून तातडीने दोघांना अटक केली. तसेच दुसर्या दिवशी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पैसे व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे, हेड कॉन्स्टेबल महेश लांगी, पोलीस कॉन्स्टेबल विकास राठोड व चंदनशिवे, पोलीस नाईक धर्मेंद्र म्हात्रे, शेडगे व घासे सहभागी होते. या प्रकरणाचा अधिक तपास पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.