| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
एटीएम कार्डद्वारे अकरा वेळा ट्रांजेक्शन करून एक लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात 23 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 70 वर्षीय विजय शंकर महाजन हे कळंबोली, हायवे दर्शन सोसायटी येथे राहत असून ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेले. यावेळी एक व्यक्ती त्याठिकाणी उभा होता. महाजन यांनी पैसे काढण्यासाठी कार्ड टाकले. यावेळी तो व्यक्ती त्यांच्या बाजूला उभा राहिला. मशीनमधून पैसे न निघाल्याने महाजन एटीएम कार्ड काढत असताना ते निघाले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने पुन्हा एटीएम पिन टाकण्यास आणि कार्ड न निघाल्याने एटीएम मशीनवर दिलेले हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यास सांगितले. त्यामुळे महाजन यांनी एटीएम पिन टाकला आणि हेल्पलाइन नंबर वर त्या व्यक्तीने त्यांना मदतीसाठी सायंकाळी चार वाजता येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महाजन तेथून निघून गेले. त्यानंतर मशीनमध्ये अडकलेले एटीएम कार्ड काढून एक लाख सहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.







