। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता 3 मार्च रोजी अज्ञात लोकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदून गायब केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी 4 एप्रिल रोजी कर्जत तहसील कार्यालयाबाहेर जुना रस्ता पुन्हा तयार होण्यासाठी उपोषण केले होते. त्यावेळी सात दिवसांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, शासकीय यंत्रणांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते यांनी सोमवार, 9 मेपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, या उपोषणाला कर्जत बेडीसगाव येथून 200 हून अधिक आदिवासी ग्रामस्थ अलिबाग येथे पोहोचले आहेत.
कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील नऊ आदिवासी वाड्यांकडे जाणारा रस्ता वांगणी गावातील अज्ञात व्यक्तींनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने गायब केला होता. 3 मार्च 2022 रोजी रस्ता गायब झाल्यानंतर आदिवासी ग्रामस्थांनी सर्व शासकीय कार्यालयांना विनंती अर्ज केले आहेत.मात्र आदिवासी शेतकरी यांच्या रस्त्याचा 300 मीटर लांबीचा भाग गायब करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही.
आदिवासी लोकांची फसवणूक करणार्या ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातील व्यक्तींवर पोलीस गुन्हा दाखल करीत नाहीत, तर जुना रस्ता तयार करून देण्याची कार्यवाही जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत नाही. त्यामुळे नऊ आदिवासी वाड्यांचा रस्ता उखडवून गायब केल्याने बंद झाला आहे.आपला जुना रस्ता पुन्हा तयार व्हावा आणि रस्ता खोदणारे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी कर्जत आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी आणि बेडीसगाव गावाचा समावेश असलेल्या शेलू ग्रामपंचायतीचे सदस्य मंगळ पारधी यांनी 9 मेपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेडीसगाव येथून 200 हुन आदिवासी लोक अलिबाग येथे पोहचले आहेत. दरम्यान, आता रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेडीसगावचा रस्ता बनवून देणार काय? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
बेडीसगावचे आदिवासी बांधव हक्काच्या रस्त्यापासून वंचित; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण
