अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा हल्ला

पंधराहून अधिक ग्रामस्थांना डंख

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील निवे येथी वटपौर्णिमेच्या दिवसाची मधमाशांच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यातील वडघर येथे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील वडघर येथील अनुबाई कोंडीराम आमले या वयोवृद्ध महिला मयत झाल्याने स्मशानात त्यांचा अंत्यविधी सुरू असतानाच अग्नी दिल्यानंतर स्मशानाशेजारीच असणाऱ्या ऐनाच्या झाडावरील मधमाशांनी ग्रामस्थांवर अचानक हल्ला चढविला आणि ग्रामस्थांना डंख मारले. यावेळी पिसाळलेल्या मधमाशांनी ग्रामस्थांच्या पाठीमागे लागून अनेकांना घरापर्यंत पळविले. मधमाशांचा पिच्छा सोडविताना ग्रामस्थांना कडकडून चावे घेणाऱ्या मधमाशांनी बेजार केले. त्यामुळे ग्रामस्थ वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत होते या हल्ल्यात सुमारे 15 ते 20 ग्रामस्थांना मधमाशांनी डंख मारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या हल्ल्यातील मधुमक्षिका दंशाने जखमी झालेल्या सात ग्रामस्थांवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर काहींनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले.

वडघर येथून पोलादपूर येथे आणलेल्या विष्णू पांडुरंग गोगावले, हनुमती रायबा कदम, नारायण हरी कदम, वासुदेव दगडू कदम, ज्ञानोबा धोंडीराम आमले यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. यावेळी रामचंद्र रामजी कदम यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले तर रामचंद्र तुकाराम कराडकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आले.

Exit mobile version