हनुमान नगर येथे विसर्जनाला गेलेल्या
| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील हनुमान नगर येथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या गणेशभक्तांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याने एकच खळबळ उडाली आहे. मधमाशांनी जवळपास 15 ते 20 भाविकांना दंश केला असून, त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना तात्काळ तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील हनुमान नगर येथील ग्रामस्थांकडून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील सर्व ग्रामस्थ, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान विसर्जन मिरवणूक खाडीकिनारी आली असता काही कळायच्या आत अचानक उठलेल्या मधमाशांनी भाविकांवर एकच हल्ला चढवला. यामुळे सर्वत्र एकच पळापळ झाली. मधमाशांनी जवळपास 15 ते 20 भाविकांना दंश केला. ज्यामध्ये लहान मुलांचादेखील समावेश होता. या सर्वांना तातडीने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मोघे यांनी जखमींवर तातडीने उपचार करून काहींना सोडून दिले. तर, ज्यांची प्रकृती गंभीर होती अशांना काही काळ निरीक्षण करून त्यांनाही घरी आराम करण्याचा सल्ला दिला.