| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाच्या मोसमातील अखेरची नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा दिल्लीत पुढील महिन्यात होणार आहे. त्यासाठी भारतीय नेमबाजी संघटनेने संघ जाहीर केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके मिळवणाऱ्या मनू भाकरने तीन महिने विश्रांती घेतल्यामुळे तिचा समावेश करण्यात आला नाही.
ही स्पर्धा 13 ते 18 ऑक्टोबर दरम्यान डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजवर होत आहे. त्यासाठी भारताचा 23 सदस्यांचा संघ आज जाहीर करण्यात आला. रायफल, पिस्तूल आणि शॉर्टगन अशा तिन्ही प्रकारातील सामने होणार आहेत.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा 11 नेमबाजांचा संघ पात्र ठरला होता. त्यातील नऊ खेळाडू या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरने भारतासाठी इतिहास रचला होता. एकाच स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदकाची कमाई केल्यानंतर तिने याच प्रकारात, परंतु मिश्र दुहेरीच्या गटात सरबज्योत सिंगसह कांस्यपदक मिळवले होते.
मनू भाकर या विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार नसली तरी आपले इतर खेळाडू चांगल्या क्षमतेचे आहेत. आपला संघ ताकदवर असून निश्चितच चांगली कामगिरी करेल, असा विश्वास नेमबाजी संघटनेचे सरचिटणीस सुलतान सिंग यांनी व्यक्त केला.
दिव्यांश सिंग पानवर (10 मी. एअर रायफल), सोमन उत्तम मस्कर (10 मी. एअर रायफल), ऱ्हिदम (10 आणि 25 मी. एअर पिस्तूल) आणि गनेमत शेखॉन (महिला स्कीट) यांची निवड थेट करण्यात आली, तर इतर खेळाडूंना त्यांच्या .ऑलिम्पिक रँकिंगनुसार स्थान देण्यात आले. ऱ्हिदम महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुरभी रावसह सहभागी होणार आहे.
खेळाडू:
ऱ्हिदम (महिला 10 मीटर एअर पिस्तूल) अर्जून बाबुता (पुरुष 10 मी. एअर रायफल), अर्जून सिंग चीमा (पुरुष 10 मी. एअर पिस्तूल), अनिश आणि विजयवी सिद्धू (पुरुष 25 मी. रॅपीड फायर पिस्तूल), श्रेयांशी सिंग आणि राजेश्वरी कुमारी (महिला ट्रॅप), महेश्वरी चौहान (महिला स्कीट) आणि अनंतजीत सिंग नारुका (पुरुष स्कीट) हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळलेले खेळाडू या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत खेळणार आहेत.