| म्हसळा | वार्ताहर |
ग्रामदेवीची आरती सुरू असताना ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 42 ग्रामस्थ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये 13 लहान मुलांचा समावेश असून, जखमींवर ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना म्हसळा तालुक्यातील गावात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
म्हसळा तालुक्यातील कोळवट गावात ग्रामदेवीच्या आरतीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ग्रामस्थ प्रचंड घाबरले. अनेकांवर मधमाशांनी डंख मारले. यामुळे काही ग्रामस्थ गंभीररित्या जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले असून, त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. काही गंभीर अवस्थेत असलेल्या रूग्णांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरतीसारख्या धार्मिक कार्यक्रमात घडलेली ही घटना दुर्दैवी असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.