| मुंबई | प्रतिनिधी |
भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर करत त्याने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटलं आहे.
कोहलीने 123 कसोटी सामन्यांत 30 शतकं व 31 अर्धशतकं झळकावली आहेत आणि त्याने 9230 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवले होते आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. तो म्हणाला,” 14 वर्षांपूर्वी मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घातला होता. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर उपयोगी येतील असे धडे शिकवले.” ”कसोटी फॉरमॅटमध्ये खेळण्यात वैयक्तिक गुणांची कसोटी लागते. या फॉरमॅटमध्ये स्वतःला शांत ठेवून कसे खेळायचे हे मी शिकलो, पाच दिवसांच्या खेळात प्रत्येक दिवस आपली परिक्षा घेतो, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायम तुमच्यासोबत राहतात,”असेही विराटने लिहिले आहे.
”मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणे सोपे नाही, पण ही योग्य वेळ आहे. मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि वाटेत मला दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहतो.”असेही तो म्हणाला. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर विराटनेही कसोटी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण बीसीसीआयने त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भारतीय क्रिकेटमध्ये प्रभाव असलेल्या व्यक्तीलाही पुढे केले, पण विराट आपल्या मतावर ठाम राहिला आणि आज अखेर त्याने निवृत्ती जाहीर केली.