। भिवंडी । प्रतिनिधी ।
भिवंडी परिसरात पुन्हा भीषण आगीची घटना घडली आहे. या अग्नितांडवात जवळपास 22 गोदाम आगीत जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीत रिचलेंड कंपाऊंड परिसरात ही भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत पाच मोठ्या कंपनी आणि मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. तर या आगीत या कंपन्यांचे 22 गोदाम जळून खाक झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केके इंडिया पेट्रोलियम स्पेशालिटीज प्रा. लि., कॅनन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ब्राइट लाईफकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, होलिसोल प्रा. मर्यादित कंपनी, अॅबॉट हेल्थकेअर प्रा. लिमिटेड कंपनी या कंपन्यांच्या गोदांमाना आग लागली आहे. यात सजावटीच्या साहित्याचे मोठे कोठार जळून खाक झाले आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात रसायने, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आरोग्याशी संबंधित प्रथिनेयुक्त अन्न पावडर, सौंदर्यप्रसाधनांचे साहित्य, कपडे, शूज, पंडाल सजावटीचे साहित्य आणि फर्निचर साठवले होते. मात्र, या आगीत ते जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी-कल्याण येथून चार अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.