94व्या अखिल भारतीय संमेलनाला सुरुवात
| नाशिक | वृत्तसंस्था |
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली. संमेलनाचे आकर्षण असलेल्या ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कुसुमाग्रसजांचे निवासस्थान टिळकनगर येथून दिंडीला सुरुवात झाली. फुलांची सजावट, टाळमृदुंगाचा गजर, लेझीमच्या तालाने, नृत्य पथक, शालेय विद्यार्थ्यांच्या सहभाने उत्साहाच्या वातावरणात दिंडीला सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादासाहेब भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. दिंडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नाशिककर पारंपरिक वेशभूषेत या दिंडीत सहभागी झाले. यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गीता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली.
साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणार्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी लितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.